जळगाव : प्रतिनिधी
राज्य शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) देण्यासाठी पाचोराहून जळगावात आलेले शिक्षक संदीप प्रल्हाद पवार (४२, मूळ रा. बिल्दी, ता. पाचोरा) यांचा परीक्षा केंद्रात जाण्यापूर्वीच हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. ही घटना रविवारी (२३ नोव्हेंबर) सकाळी मू.जे. महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, पाचोरा तालुक्यातील लाखतांडा येथील जि.प. प्राथमिक शाळेत संदीप पवार हे कार्यरत होते. दुचाकीने आल्यावर परीक्षेसाठी आत जाण्यापूर्वी ते महाविद्यालयासमोरील दुकानावर झेरॉक्स काढण्यासाठी गेले. तेथेच त्यांना हृदयविकाराचा झटका आला. सहकाऱ्यांनी त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मयत घोषित केले. पवार यांच्या पश्चात पत्नी व मुलगा आहे. ते जुनी पेन्शन संघटनेचे विश्वस्त तसेच शिक्षक सेनेचे पाचोरा तालुकाध्यक्ष होते.


