चाळीसगाव : प्रतिनिधी
चाळीसगाव नगरपालिका निवडणुकीत नदीपलीकडील नागरिकांच्या दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या विकासाच्या मागण्यांना न्याय मिळवून देण्यासाठी ही निवडणूक निर्णायक असल्याचा संदेश भाजपने रविवारी आयोजित सभेत दिला. प्रभाग क्रमांक १३ व १४ मधील भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभा मोठ्या उत्साहात पार पडली.
सभेला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून विकासाच्या आश्वासनांना प्रतिसाद देत ‘द बेस्ट चाळीसगाव’ या संकल्पनेला पाठिंबा दर्शविला. अनेक दशकांपासून मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप करीत या भागातील समस्यांवर उपाय करण्याचे वचन आमदार मंगेश रमेश चव्हाण यांनी यावेळी दिले.
आमदार चव्हाण म्हणाले की, “नदीपलीकडील भागाने वर्षानुवर्षे एका पक्षावर विश्वास ठेवून मत दिले, मात्र मूलभूत सुविधांसाठीही नागरिकांना सतत संघर्ष करावा लागला. आमदारकीच्या अवघ्या काही वर्षांत रस्त्यांसह नाल्याच्या समस्यांवर कायमस्वरूपी तोडगा काढला. ही फक्त सुरुवात आहे; पुढील काळात हा भाग पूर्णपणे विकसित करण्याचा आमचा निर्धार आहे.”
सभेत नगराध्यक्ष पदाच्या अधिकृत उमेदवार सौ. प्रतिभा मंगेश चव्हाण तसेच प्रभागातील सर्व भाजप उमेदवारांची उपस्थिती होती. भाजपच्या टीम व स्थानिक कार्यकर्त्यांनी नागरिकांशी संवाद साधत पक्षाच्या योजनांची माहिती दिली. आमदार चव्हाण यांनी आवाहन केले की, “प्रभाग १३ व १४ मधील सर्व उमेदवारांना विक्रमी मतांनी निवडून देऊन विकासाचा वेग वाढवण्यास नागरिकांनी हातभार लावावा. ‘द बेस्ट चाळीसगाव’ घडविण्यासाठी तुमचा पाठींबा अत्यावश्यक आहे.” सभेला परिसरातील युवक, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांनीही मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्साहाचे वातावरण निर्माण केले.


