चोपडा : प्रतिनिधी
आगामी नगरपालिका निवडणूक २०२५ च्या पार्श्वभूमीवर भाजप–राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (राष्ट्रवादी) युतीतर्फे शहरात भव्य रॅली आणि आढावा बैठक आयोजित करण्यात आली. उत्साह, ऊर्जा आणि मोठ्या प्रमाणावरील जनसहभागामुळे ही सभा विशेष ठरली. युतीच्या नेत्यांच्या मते, मिळत असलेल्या लोकसमर्थनामुळे विजय निश्चित असल्याची भावना अधिक दृढ झाली आहे.
रॅलीदरम्यान शहरातील विविध प्रभागांत पक्षाच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत वातावरण प्राणवान केले. नागरिकांनीही मोठ्या उत्साहाने रॅलीचे स्वागत केले. त्यानंतर घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत स्थानिक परिस्थिती, निवडणूक व्यवस्थापन, प्रचाराची आगामी रूपरेषा आणि संघटन बळकटीवर विस्तृत चर्चा झाली.
या कार्यक्रमाला भाजप प्रवक्ते अॅड. अनिकेत निकम, जीवन चौधरी, भाजप जळगाव पूर्व सरचिटणीस राकेश पाटील, तालुकाध्यक्ष कांतीलाल पाटील, शहराध्यक्ष नरेन्द्र पाटील, नगराध्यक्ष पदाच्या अधिकृत उमेदवार सौ. साधना ताई नितीन चौधरी तसेच इतर सर्व उमेदवार, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली.
कार्यक्रमादरम्यान बोलताना रोहित निकम यांनी सांगितले की, “जनतेचा विश्वास, पाठींबा आणि आशीर्वाद हे आमचे सर्वात मोठे बळ आहे. या प्रचंड जनसमर्थनामुळे युतीचा विजय निश्चित असून आगामी वाटचाल अधिक सामर्थ्यवान होणार आहे.” चोपडा शहरात होत असलेल्या या राजकीय घडामोडींमुळे निवडणुकीची रणधुमाळी अधिक रंगतदार होणार असल्याचे राजकीय निरीक्षकांचे मत आहे.



