अंबरनाथ : वृत्तसंस्था
शहरातील उड्डाणपुलावर शुक्रवारी संध्याकाळी झालेल्या भीषण अपघातात चार जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. ही संपूर्ण घटना उड्डाणपुलाशेजारील इमारतीवर बसवलेल्या सीसीटीव्हीत स्पष्टपणे कैद झाली आहे.
शुक्रवारी संध्याकाळी ६:४२ च्या सुमारास कार चालवत असताना चालकाला हृदयविकाराचा झटका आल्याची प्राथमिक माहिती आहे. त्यामुळे नियंत्रण सुटलेली कार रस्त्यावरून भरधाव वेगाने पुढे धावत गेली आणि समोरून येणाऱ्या अनेक वाहनांना जोरदार धडक दिली. या अचानक धडकेचा इतका जोर होता की कारने दोन दुचाकींना चिरडले, तर इतर तीन ते चार दुचाकींना धडक देत कार उलटली.
सीसीटीव्ही दृश्यांमध्ये एक दुचाकीस्वार धक्क्याच्या जोराने हवेत दोन-तीन फूट उडून उड्डाणपुलाच्या दुसऱ्या बाजूला जाऊन पडताना दिसत आहे. त्या वेळी रस्त्यावरून काही पादचारीही जात होते; मात्र सुदैवाने ते या भीषण अपघातातून थोडक्यात बचावले. अपघातानंतर काही क्षणातच उड्डाणपुलावर आणि खाली रस्त्यावर मोठी गर्दी जमा झाली. स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदतकार्य सुरू केले. पोलिस आणि अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेत जखमींना जवळच्या रुग्णालयात हलवले. घटनास्थळी मिळालेल्या माहितीनुसार चार जणांना गंभीर दुखापतीमुळे मृत घोषित करण्यात आले. इतर तिघे गंभीर जखमी असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.
या भीषण अपघातामुळे अंबरनाथ परिसरात शोककळा पसरली असून उड्डाणपुलावर काही काळ वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. पुढील तपास अंबरनाथ पोलिसांकडून सुरू आहे.


