मुंबई : वृत्तसंस्था
राज्याच्या राजकारणातील एक महत्वाची बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस(शप) पक्षाने आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत शिवसेना (उबाठा) प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्याशी युती करण्याचे संकेत दिले आहेत. मुंबईत शरद पवारांच्या नेतृत्त्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसची महत्त्वाची बैठक पार पडली.
युतीसाठी शिवसेना (उबाठा) शी चर्चा करण्याचा एकमताने घेण्यात निर्णय आला. भाजप सोडून इतरांसोबत युती करण्यास हरकत नाही. समाजवादी पक्ष किंवा मनसे सोबतदेखील युती करण्यास हरकत नसल्याची भूमिका या बैठकीत घेण्यात आली आहे. दरम्यान, महानगरपालिकेसाठी मनसेला सोबत घ्यायचे की नाही, याबाबत काँग्रेसमध्ये मतभेद दिसत आहेत.
शरद पवार यांनी आपण आघाडीत लढलो पाहिजे ही भूमिका मांडल्याचे काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटले होते. भाजपला हरवण्यासाठी सर्वांनी एकत्रित आले पाहिजे अशी आमची ही भूमिका आहे. आम्ही त्यासंदर्भात सकारात्मक असल्याचे असे सांगत विजय वडेट्टीवार यांनी मनसेसोबत एकत्र येण्याच्या पर्यायाचे संकेत दिले होते. मात्र, मुंबई काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष वर्षा गायकवाड यांनी ही शक्यता पूर्णपणे फेटाळून लावली होती.


