मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील मालेगावमध्ये अल्पवयीन बालिकेवर झालेल्या अत्याचार व हत्या प्रकरणानंतर शहरात निर्माण झालेला संताप शिगेला पोहोचला आहे. न्यायालय परिसरात जमावाने अचानक धाव घेत गेटकडे ढकलाढकली केली आणि कोर्टात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. या घटनाक्रमानंतर राज्यातील राजकीय वातावरणही तापले असून काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. हा जनतेचा उद्रेक आहे. आज तो गुन्हेगाराविरोधात आहे, पण उद्या हा उद्रेक थेट सरकारविरोधातही उसळू शकतो, अशा शब्दांत त्यांनी परिस्थितीचे गांभीर्य स्पष्ट केले.
वडेट्टीवार म्हणाले की, एकेकाळी महाराष्ट्र पोलिसांचा देशभर दरारा होता. कठोर कारवाई, गुन्हेगारीवर नियंत्रण आणि कायद्याची अंमलबजावणी यासाठी महाराष्ट्र ओळखला जात होता. परंतु गेल्या काही वर्षांत ही धार कमी होत चालली आहे, असे त्यांनी सांगितले. त्यांच्या मते, गुन्हेगारांमध्ये कायद्याची भीती राहिलेली नाही. त्यामुळे अशा प्रकारची निर्घृण कृत्ये करण्यास गुन्हेगारांची हिंमत वाढली आहे. लोकांच्या मनात आपल्याला न्याय मिळणार नाही अशी भावना निर्माण झाली आहे आणि याच अविश्वासातून कोर्टाच्या गेटवर जमावाचा उद्रेक दिसून आला, असे वडेट्टीवार यांनी म्हटले.
काँग्रेसचे नेते वडेट्टीवार म्हणाले की, पोलिस यंत्रणेची स्थिती चिंताजनक झालेली आहे. कायद्याची अंमलबजावणी होत नसल्याने, तपास व शिक्षा प्रक्रीया उशिरा होत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र असंतोष आहे. सरकारने आणि पोलिस खात्याने यावर ताबडतोब सुधारणा करणे गरजेचे आहे. हे फक्त मालेगावचे प्रकरण नाही; राज्यभर अशा घटना वाढत आहेत. लोकांचा सरकारवरील आणि पोलिसांवरील विश्वास ढासळत चालला आहे, असे त्यांनी सांगितले. वडेट्टीवार यांनी सरकारला प्रश्न केला की, जर जनतेलाच न्यायालयात धाव घ्यावी लागत असेल, तर मग शासन आणि पोलिस यंत्रणा नेमकी कुठे आहे?
या संदर्भात त्यांनी सांगितले की त्यांच्या सरकारच्या काळात अशा गंभीर आणि संवेदनशील प्रकरणांसाठी शक्ती कायदा आणला होता. हा कायदा महिलांवरील आणि अल्पवयीन मुलींवरील अत्याचारांच्या प्रकरणात कठोर शिक्षा देण्यासाठी तयार करण्यात आला होता. मात्र सध्याच्या सरकारकडून या कायद्याची अंमलबजावणी योग्य पद्धतीने होत नाही, अशी टीकाही त्यांनी केली. तसेच पोस्को कायद्याचे पालनही प्रभावीपणे होत नसल्याचे त्यांनी म्हटले. कायद्याला धार नसली की गुन्हेगारांना वाव मिळतो, असे वडेट्टीवार म्हणाले.


