लखनऊ : वृत्तसंस्था
उत्तर प्रदेशातील लखीमपूर येथून एक विलक्षण आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. दीड वर्षांच्या एका बालकाच्या पाठीवर जन्मापासूनच शेपटीसारखी वाढ होत असल्याने कुटुंबाने त्याला हनुमानाचा अवतार मानून पूजा केली. मात्र त्यामागे गंभीर वैद्यकीय विकार असल्याचे उघड झाल्यानंतर डॉक्टरांनी तातडीने शस्त्रक्रिया करून त्याचे प्राण वाचवले.
सदर बालकाच्या पाठीवरील ही शेपटी 14 सेंटीमीटर लांब होती. मुलाला चालताना, झोपताना किंवा त्या भागाला स्पर्श झाल्यावर तीव्र वेदना होत होत्या. त्यामुळे पालकांनी अखेर लखनौच्या बलरामपूर रुग्णालयाचा आश्रय घेतला. डॉक्टरांनी तपासणीनंतर हे प्रकरण धार्मिक चमत्कार नसून स्पायना बिफिडा ऑक्लटा नावाच्या दुर्मिळ विकारामुळे शेपटीसारखा उभार वाढल्याचे स्पष्ट केले. रुग्णालयातील बालरोग शल्यचिकित्सक डॉ. अखिलेश कुमार यांनी दीड तास चाललेली अत्यंत गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्ण केली. शेपटी मणक्याच्या पडद्याशी खोलवर जोडलेली असल्याने प्रत्येक पावलावर उच्च कौशल्याची गरज होती. शस्त्रक्रियेनंतर मुलाला आयसीयूमध्ये ठेवण्यात आले असून त्याची प्रकृती आता स्थिर आहे.
मुलाचे वडील सुशील कुमार, जे व्यवसायाने शेतकरी आहेत, यांनी लखीमपूरमधील अनेक रुग्णालयांत संपर्क साधला होता. मात्र, प्रकरण गंभीर आणि जोखमीचे असल्याने स्थानिक डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करण्यास नकार दिला. अखेर लखनऊतील बलरामपूर रुग्णालयाने जबाबदारी स्वीकारत मुलाला नवे जीवन दिले.
यांनी केली यशस्वी शस्त्रक्रिया
सर्जिकल टीममध्ये डॉ. अखिलेश कुमार, ऍनेस्थेसिया टीममध्ये डॉ. एस.ए. मिर्झा, डॉ. एम.पी. सिंह, नर्सिंग आणि सपोर्ट स्टाफ निर्मला मिश्रा, अंजना सिंग, डॉ. मनीष वर्मा (इंटर्न) आणि वॉर्ड बॉय राजू यांचा समावेश होता.


