संकटमोचकांचा करिश्मा : जामनेर नगराध्यक्षपदी साधना महाजन
जामनेर : प्रतिनिधी
राज्यात अनेक ठिकाणी भाजपकडून नगराध्यक्ष बिनविरोध होत असल्याच्या चर्चेला आता जळगाव जिल्ह्यातही अधिक बळ मिळाले आहे. मंत्री गिरीश महाजन यांच्या बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या जामनेर नगरपालिकेत लोकनियुक्त नगराध्यक्षपदावर साधनाताई गिरीश महाजन यांची बिनविरोध निवड झाली असून, भाजपसाठी ही मोठी प्रतिष्ठेची कामगिरी मानली जात आहे.
जामनेरमध्ये महाजन यांच्या प्रभावी राजकीय संघटनशक्तीची पुन्हा एकदा झलक दिसली. नगराध्यक्षपदासाठी कोणत्याही प्रतिस्पर्ध्याने उमेदवारी दाखल न केल्याने साधनाताई महाजन यांची निवड घोषीत करण्यात आली. यानंतर शहरात भाजप कार्यकर्त्यांनी विजयी जल्लोष करत फटाक्यांची आतषबाजी, ढोल-ताशांच्या गजरात आनंदोत्सव साजरा केला. यासोबतच संपूर्ण नगरपालिका बिनविरोध होण्याचीही चर्चा स्थानिक राजकीय वर्तुळात रंगत असून भाजपच्या या संघटनात्मक ताकदीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
भाजप नेते व कार्यकर्त्यांच्यामते, स्थानिक स्वराज्य संस्थेतील बिनविरोध विजया मागे गिरीश महाजन यांची प्रतिमा, मतदारांशी असलेला थेट संपर्क आणि सातत्याने केलेली विकासकामे हेच प्रमुख कारण मानले जात आहे. जामनेर नगरपालिकेतील हा बिनविरोध विजय आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकांमध्ये भाजपला अनुकूल वातावरण तयार करणारा ठरेल, असा अंदाज राजकीय जाणकार व्यक्त करत आहेत.


