मुंबई : प्रतिनिधी
राज्यातील सत्ताधारी महायुतीमध्ये निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज अचानक दिल्ली दौऱ्यावर रवाना झाले. ते दिल्लीमध्ये भाजपच्या उच्चपदस्थ नेत्यांची भेट घेऊन राज्यातील चालू राजकीय घडामोडींवर चर्चा करणार असल्याची माहिती मिळते. शिवसेना शिंदे गटाने मंगळवारी भाजपवर पक्षातील पदाधिकारी फोडण्याचा आरोप केला होता. या आरोपानंतर शिंदे गटातील मंत्र्यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीवर बहिष्कार टाकला होता. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी शिंदेंचा दिल्ली दौरा महत्त्वाचा मानला जात आहे.
मंगळवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिंदे गटाचे मंत्री गैरहजर राहिले. बैठकीनंतर शिंदे आणि त्यांच्या मंत्र्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी फडणवीसांनी शिंदे गटाच्या मंत्र्यांना फटकारल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. या तणावानंतर बुधवारी शिंदेंनी फडणवीसांसोबत एका कार्यक्रमात एकत्र उपस्थित राहणे टाळले.
सूत्रांच्या माहितीनुसार, एकनाथ शिंदे दिल्लीमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची भेट घेणार असून महायुतीतील समन्वय, शिंदे गटाची नाराजी आणि अलीकडील घडामोडींवर चर्चा होणार आहे. दिल्लीहून ते बिहारचे नवे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या शपथविधीला पाटण्याला जाणार आहेत.
दरम्यान, शिंदेंच्या दिल्ली दौऱ्याची माहिती मिळताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची वर्षा निवासस्थानी तातडीची बैठक झाली. या बैठकीत शिंदे गटातील नाराजी कशी दूर करावी, तसेच पुढील राजकीय परिस्थिती हाताळण्याबाबत चर्चा झाल्याचे कळते. काँग्रेसनेही या घडामोडींवर प्रतिक्रिया दिली. खासदार वर्षा गायकवाड यांनी ‘महफ़िल में जिस को भी देखो रूठा रूठा लगता है’ या शायरीद्वारे महायुतीवर टिका केली. गेल्या काही महिन्यांत शिंदे यांच्या दिल्ली भेटीत वाढ झाली आहे. वाद निर्माण झाला की शिंदे दिल्लीतील केंद्रीय नेतृत्वाशी संवाद साधतात. त्यामुळे या दौऱ्याला पुन्हा एकदा महत्त्वाचा राजकीय अर्थ लावला जात आहे.


