जळगाव : प्रतिनिधी
जळगाव शहरातील लक्ष्मी नगर भागात दोन महिने बंद असलेल्या घरात घरफोडी करून संसारोपयोगी वस्तू चोरणाऱ्या टोळीला एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी ५२ हजार रुपये किमतीचा चोरीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील लक्ष्मी नगर भागात राहणारे फिर्यादी राजेंद्र दुसाने घरातील एलईडी टीव्ही, फ्रीज, कुलर, गॅस शेगडी, तांबे-पितळी भांडी यासह इतर संसारोपयोगी वस्तू चोरीला गेल्याचे १२ नोव्हेंबर रोजी निष्पन्न झाले. त्यानुसार एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांनी तातडीने पोउनि राहुल तायडे, पोउनि चंद्रकांत धनके यांच्यासह अनुभवी अंमलदारांचे एक पथक नेमले. गोपनीय माहितीच्या आधारे पथकाने लक्ष्मी नगर भागात सापळा रचून संदीप तुळशीराम शेवरे ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान, त्याने आपला साथीदार राहुल सुपडू चौधरी आणि एका अल्पवयीन मुलासह मिळून गुन्हा केल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याच्याकडून चोरी केलेला ५२ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. तसेच संशयित आरोपी राहुल चौधरी यालाही ताब्यात घेऊन गुन्हा करण्यासाठी वापरलेली रिक्षा जप्त करण्यात आली आहे.


