जळगाव : प्रतिनिधी
गेट टुगेदर’ कार्यक्रमाहून घराजवळ पोहोचल्यानंतर तेथे दुचाकीवरून आलेल्या दोघांनी अनिता अरुण ढाके (४८, रा. अयोध्यानगर) यांच्या गळ्यातील आठ ग्रॅमची सोनपोत व १० ग्रॅमची सोन्याची चेन ओढून नेली. ही घटना रविवारी (दि. १६) अयोध्या नगरातील संजीवनी अपार्टमेंटजवळ घडली. एमआडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अयोध्या नगरातील अनिता ढाके या काशीबाई कोल्हे शाळेत येथे ‘गेट टुगेदर’च्या कार्यक्रमासाठी गेल्या होत्या. तेथून त्या मैत्रिणींकडे व त्यानंतर घरी पोहोचल्या. संजीवनी अपार्टमेंटजवळ पोहोचल्यानंतर दुचाकीवरून उतरत असताना दुचाकीवरून दोनजण आले. त्यातील एकाने महिलेच्या गळ्यातील ४० हजारांची आठ ग्रॅमची सोनपोत आणि ५० हजार रुपयांची १० ग्रॅमची सोन्याची चेन ओढून चोरटा दुचाकीवरून पसार झाला. याप्रकरणी अनिता ढाके यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल आहे. पुढील तपास उपनिरीक्षक राहुल तायडे करीत आहेत.


