मुंबई : वृत्तसंस्था
घाटकोपर परिसरातील एका शाळेत सोमवारी सकाळी घडलेल्या प्रकाराने पालकांमध्ये आणि परिसरातील नागरिकांमध्ये मोठी खळबळ उडाली. शाळेच्या कॅन्टीनमध्ये दिलेल्या समोशामुळे तब्बल 15 ते 16 विद्यार्थ्यांची अचानक तब्येत बिघडली. सकाळच्या सुट्टीत अनेक विद्यार्थ्यांनी समोसे खाल्ल्यानंतर काही मिनिटांतच त्यांना मळमळ, चक्कर आणि उलट्यांचा त्रास जाणवू लागला.
परिस्थिती गंभीर होताच शिक्षक आणि शाळा प्रशासनाने तातडीने वैद्यकीय पथक बोलावले. काही विद्यार्थ्यांना पालिकेच्या दवाखान्यात नेण्यात आले, तर काही पालकांनी स्वतःच्या वाहनातून मुलांना खासगी रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर असून कोणताही गंभीर धोका नाही.
घटनेनंतर पालकांनी शाळेच्या कॅन्टीन व्यवस्थापनाबद्दल नाराजी व्यक्त केली. विशेष म्हणजे, शाळेच्या प्राचार्यांनीही समोसा चाखताना त्याला विचित्र, कापूरासारखा वास येत असल्याचे सांगितले. त्यांच्या म्हणण्यानुसार, समोसा बनवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या तेलात देवासमोर ठेवलेला कापूर चुकून पडल्याची शक्यता आहे. हेच तेल वापरून समोसे बनवल्याने विद्यार्थ्यांची तब्येत बिघडली असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.
घटनेनंतर पालिकेच्या वैद्यकीय पथकाने शाळेत भेट देत सर्व विद्यार्थ्यांची तपासणी केली. यामध्ये दोन विद्यार्थी — इकरा जाफर नियाज सय्यद (11) आणि वैजा गुलाम हुसेन (10) — यांना पुढील तपासणीसाठी राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. दोघांचीही प्रकृती सुधारत असून ते धोक्याबाहेर आहेत, अशी माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली. तर राजीव खान, आरुष खान आणि अफजल शेख ही मुले उपचारानंतर घरी परतली आहेत. वेळेवर उपचार मिळाल्याने गंभीर परिणाम टळले, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. शाळा प्रशासनाने घटनेची चौकशी सुरू केली असून कॅन्टीनच्या कामकाजाची तपासणी करण्यात येत आहे.


