धुळे : प्रतिनिधी
पिंपळनेर येथील शासकीय आदिवासी मुलींच्या वस्तीगृहात एका १८ वर्षीय विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रात्री २.५५ वाजेच्या -सुमारास उघडकीस आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, निशा राया वाळवी (वय १८, रा. अस्तंबा, जि. नंदुरबार) या विद्यार्थिनीने १७ नोव्हेंबर रोजी रात्री २.५५ वाजता वस्तीगृहाच्या दुसऱ्या इमारतीतील शौचालयाच्या खिडकीत ओढणी बांधून आत्महत्या केली. वॉचमन सुनीता पावरा यांनी तातडीने गृहपाल विमल जाधव यांना याची माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी धाव घेत विद्यार्थ्यांनीस पहाटे ४ वाजता ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तेथील वैद्यकीय अधिकारी डॉ. महाजन यांनी विद्यार्थिनीस तपासून मृत घोषित केले. याबाबत पिंपळनेर पोलिसात घटनेची नोंद करण्यात आली आहे.
विद्यार्थिनीकडे कुठल्याही प्रकारची सुसाईड नोट आढळून आली नाही. त्यामुळे आत्महत्येचे कारण गुलदस्त्यात आहे. याप्रकरणी आदिवासी बचाव संघटनेच्या कार्यकर्त्यांनी वस्तीगृहाच्या ठिकाणी आंदोलन केले. यावेळी गृहपालांना निलंबित करावे व त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा यासाठी आंदोलन केले. वरिष्ठांनी या गृहपालास निलंबित केले असून तपास सपोनी किरण बर्गे करीत आहे.


