मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्ज माफीवरून राजकारण चांगलेच तापले असून आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या नव्या वक्तव्यामुळे या चर्चेला नवे वळण मिळाले आहे. अलीकडच्या अतिवृष्टीमुळे मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात झालेले शेतीचे नुकसान, त्यावरचे भरपाईचे पॅकेज आणि कर्जमाफीची मागणी, या सर्वांवर विरोधक सरकारला घेरत असतानाच फडणवीस यांनी कर्जमाफी महत्त्वाचीच आहे, पण कर्जमाफी हे अंतिम उत्तर नसल्याचे स्पष्ट केले आहे. यामुळे सरकारची भूमिका नेमकी काय? असा प्रश्न पुन्हा एकदा पुढे आला आहे.
मराठवाड्यात मागील काही दिवसांत अतिवृष्टी झाली आणि अनेक भागामध्ये शेतजमिनी, पिके, गुरेढोरे वाहून गेली. या अनपेक्षित आपत्तीमुळे हजारो शेतकरी अडचणीत सापडले. राज्य सरकारने नुकसानभरपाईसाठी पॅकेज जाहीर केले असले तरी ते अत्यल्प असून शेतकऱ्यांच्या दु:खाला न्याय देणारे नाही, अशी टीका विरोधकांनी केली. उद्धव ठाकरे स्वतः मराठवाड्यात दौऱ्यावर गेले होते आणि त्यांनी शेतकऱ्यांशी थेट संवाद साधला. त्यांनी राज्य सरकारची पहिल्या टप्प्यातील मदत प्रत्यक्षात शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली का, याचा आढावा घेत सरकारवर तीव्र टीका केली. तसेच आमच्या सरकारने सर्वसमावेशक कर्जमाफी केली होती, याच धर्तीवर या सरकारनेही तत्काळ कर्जमाफी करावी, अशी मागणी त्यांनी पुन्हा एकदा केली.
याच पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधताना कर्जमाफीबाबत मोठे विधान केले. ते म्हणाले की, कर्जमाफी नक्कीच महत्त्वाची आहे. आम्ही ती महत्त्वाचीच मानतो. पण कर्जमाफी हे शेती समस्येचं अंतिम उत्तर नाही. यामुळे तात्पुरता दिलासा मिळतो, पण भविष्यातील संकट टळत नाही. फडणवीस पुढे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या मिशननुसार राज्यातील 25 हजार हेक्टर शेती नैसर्गिक शेतीकडे वळवण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यासाठी बियाणे कंपन्यांना आवश्यक ते मार्गदर्शन देण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
कर्जमाफीच्या चर्चेपलीकडे जाऊन फडणवीस यांनी शेतीमधील शाश्वततेवर भर दिला. त्यांनी स्पष्ट केले की, अंतिम उपाय म्हणजे शेतीमध्ये शाश्वतता आणणे. उत्पादन खर्च कमी झाला पाहिजे, उत्पादकता वाढली पाहिजे, तेव्हाच शेतकऱ्यांची खरी प्रगती होईल. त्यांनी सांगितले की शेतीमध्ये नवीन तंत्रज्ञान, स्मार्ट प्रकल्प आणि आधुनिक पद्धतींचा वापर हा काळाचा गरज असून याच माध्यमातून शेती नफ्यात आणता येईल. मराठवाड्यातील नुकसानीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हा मुद्दा विशेषत्वाने मांडला. तसेच बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांनी त्यांना विनम्र अभिवादनही केले.


