नवी दिल्ली : वृत्तसंस्था
सौदी अरेबियात आज पहाटे भीषण रस्ता अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. झालेल्या भीषण रस्ते अपघातात किमान ४२ भारतीय उमराह यात्रेकरूंचा होरपळून मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
आज मक्काहून मदीनाला जाणारी एक प्रवासी बसची डिझेल टँकरला जोराची धडक झाली. या दुर्दैवी अपघातात ४२ भारतीय उमराह यात्रेकरूंचा होरपळून मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. समोर आलेल्या प्राथमिक वृत्तानुसार, ही घटना भारतीय वेळेनुसार पहाटे १:३० वाजता मुफ्रीहाट याठिकाणी घडली.
सुरुवातीच्या वृत्तांनुसार, धडक इतकी भीषण होती की अनेक लोक जागीच मृत्युमुखी पडले, तर अनेक जण जखमी झाले. स्थानिक अधिकारी आणि आपत्कालीन पथके तात्काळ घटनास्थळी पोहोचली आणि बचाव आणि मदत कार्य सुरू केले. बसमधील सर्व प्रवासी हैदराबादचे होते, ज्यात महिला, मुले आणि पुरुषांचा समावेश होता. त्यात २० महिला आणि ११ मुले होती. बरेच प्रवासी झोपेत होते आणि त्यांना काही समजण्याच्या आत अपघात झाला. उमराह पूर्ण केल्यानंतर, ते मदीनाला जात होते, जिथे त्यांना भेट द्यायची होती.



