जळगाव : प्रतिनिधी
कोंबींग ऑपरेशन दरम्यान पोलीस रस्त्यावर कारवाईसाठी सज्ज होते. ईच्छादेवी चौफुलीकडून पाण्याच्या गळतीने डंपर धावत होता. हा प्रकार अजिंठा चौफुलीवर मोहिमेत कार्यरत पोलिसांच्या नजरानी हेरला. या वाहनात वाळू असल्याचा संशय येताच पोलिसांनी डंपर रोखला. वाहनाच्या तपासणीत विना परवाना चालक वाळुची चोरटी वाहतूक करत असल्याचा प्रकार शुक्रवारी पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास शहरात समोर आला.
गोपनीयरित्या कोंबींग ऑपरेशन राबविण्यासाठी शुक्रवारी पहाटे अचानक पोलीस शहरातील रस्त्यावर उतरले. या मोहिमेनुसार अजिंठा चौफुलीवर हॉटेलसमोर एमआयडीसी पोलीस कारवाईसाठी सज्ज होते. दरम्यान साडेपाच वाजेच्या सुमारास एका टाटा कंपनीचा हायवा डंपर ईच्छादेवी चौकाकडून एमआयडीसीच्या दिशेने महामार्गावरुन येत होता. डंपरच्या पुढे अथवा मागे परवाना पासिंग नंबर टाकलेला नव्हता. हा डंपर अजिंठा चौफुली मनोहर हॉटेल समोरुन जात असताना डंपरमधुन रस्त्यावर पाण्याची संततधार असल्याचा प्रकार पोलिसांच्या नजरानी हेरला. या वाहनात वाळु असल्याचा संशय बळावल्याने पोलिसांनी चालकाला इशारा देत डंपर थांबविले. वाळु वाहतुकीच्या परवाना बद्दल त्याला विचारणा केली असता कोणत्याही प्रकारचा परवाना जवळ नसल्याची डंपर चालकाने कबुली दिली.
ही कारवाई पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक राजेंद्र उगले, हवालदार किरण चौधरी, हवालदार गिरीष पाटील, हवालदार रामकृष्ण पाटील, हवालदार विलास पाटील यांनी केली. याप्रकरणी कॉन्सटेबल शशिकांत मराठे यांच्या तक्रारीनुसार डंपर चालकावर एमआयडीसी पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जमीन महसूल संहिता तसेच पर्यावरण संरक्षण अधिनियमनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. हवालदार चंद्रकांत पाटील हे तपास करीत आहेत.


