मुंबई : वृत्तसंस्था
देशातील बिहार राज्यातील विधानसभा निवडणुकीत भाजप, ईव्हीएम व निवडणूक आयोगाच्या महायुतीचा विजय झाल्याचा घणाघात वंचित बहुजन आघाडीने केला आहे. वंचितने या प्रकरणी काँग्रेसला आपण मोठा भाऊ असल्याच्या भूमिकेतून बाहेर येण्याचाही सल्ला दिला आहे. काँग्रेसने मोठ्या भावाच्या भूमिकेतून बाहेर यावे. आम्ही तुम्हाला भाऊ मानू, तुमच्याशी युतीही करू. पण तुम्ही मोठे राहिला नाहीत, हे काँग्रेसने समजून घेतले पाहिजे, असे वंचितने म्हटले आहे.
बिहार विधानसभा निवडणुकीत भाजप – जदयु आघाडीचा दैदिप्यमान विजय झाला. यामुळे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या नेतृत्वात तिथे एनडीएचे सलग 5 व्यांदा सरकार येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. विरोधकांनी या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात मतांचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप केला आहे. त्यांच्या या सूरात आता वंचित बहुजन आघाडीनेही सूर मिळवला आहे. वंचितचे नेते सुजात आंबेडकर यांनी बिहार विधानसभा निवडणुकीत भाजप, मतदान यंत्र व निवडणूक आयोग या तिघांच्या महायुतीचा विजय झाल्याचा आरोप केला आहे.
सुजात आंबेडकर म्हणाले, आज बिहार निवडणुकीचा निकाल आला. त्यात भाजप, ईव्हीएम आणि निवडणूक आयोग यांच्या महागठबंधनने विजय मिळवला. या बिहार निवडणुकीत काँग्रेसने एक घोडचूक केली ती म्हणजे, काँग्रेसची बिहारमध्ये ताकद नसतांना, त्यांचे तिथे नेतृत्व नसतांना आरजेडीशी वाद घालून त्यांनी जास्तीच्या जागा घेतल्या आणि त्या जागांवर काँग्रेसला मोठा पराभव पत्कारावा लागला. त्यामुळे बिहारमध्ये आरजेडी-काँग्रेसला फटका बसला.
प्रकाश आंबेडकरांचे सुपुत्र सुजात आंबेडकर यांनी यावेळी काँग्रेसपुढे मैत्रीचा हात पुढे करत देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाचे योगदान देणाऱ्या या पक्षाला आपण मोठा भाऊ राहिलो नसल्याची वस्तुस्थिती स्वीकारण्याचा टोलाही हाणला. काँग्रेसने ‘बिग ब्रदर’च्या भूमिकेतून बाहेर यावे. आम्ही तुम्हाला ‘ब्रदर’ मानू, तुमच्याशी युती सुद्धा करू पण, तुम्ही ‘बिग’ राहिलेले नाहीत, हे काँग्रेसने समजून घ्यावे. जिथे वंचित बहुज आघाडीचा सन्मान ठेवला जाईल, जिथे सन्मानपूर्वक कार्यकर्त्यांना जागा मिळतील. तिथे नक्कीच वंचित बहुजन आघाडी युती करेल.
प्रस्थापित नेत्यांना आमचं एक सांगणे आहे की, तुम्ही कधी शहाणे होणार? काँग्रेसच्या स्थानिक लीडरशिपने शहाणपण दाखवत स्थानिक पातळीवर वंचित बहुजन आघाडीसोबत युती करायचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. हाच शहाणपणा 2019, 2024 च्या निवडणुकीत काँग्रेसच्या राज्याच्या नेत्यांनी दाखवला असता, तर त्यांचा सुपडा साफ झाला नसता, असे ते म्हणाले.


