जळगाव : प्रतिनिधी
शहरालगत गिरणा नदीच्या पात्रातून मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या अवैध वाळू उपशावर जिल्हा प्रशासनाने दि. १४ नोव्हेंबर रोजी कारवाई केली. खेडी खुर्द, धानोरा, दापोरा, निमखेडी, कांताई बंधारा परिसरात प्रशासनाच्या पथकांनी एकाच वेळी धाड टाकत जवळपास एक ते दीड किलोमीटर लांबीचा अवैध वाळू साठा जप्त केला. जप्त झालेल्या वाळूची अंदाजे किंमत कोट्यवधी रुपयांपर्यंत असल्याचे प्राथमिक अंदाजात स्पष्ट झाले आहे.
ही कारवाई जिल्हाधिकारी रोहन घुगे, अप्पर जिल्हाधिकारी श्रीमंत हारकर यांच्या पथकाने केली आहे. दीर्घकाळापासून सुरू असलेल्या रेती उपशाच्या तक्रारी, नदीपात्राचा होत असलेला ऱ्हास आणि पर्यावरणीय धोके लक्षात घेऊन ही मोहिम राबवण्यात आली. अवैधपणे वाळू उपसा होत असल्याची तक्रार प्रशासनाला मिळाली होती. या पार्श्वभूमीवर अचानक कारवाई करण्यात आली. जप्त केलेल्या संपूर्ण वाळू साठ्याचा पंचनामा युद्धपातळीवर सुरू असून आहे. अवैध वाळू उपस्यासाठी वापरलेली साधने, यंत्रसामग्री जप्त करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी सांगितले की, अवैध वाळू उपशामुळे पर्यावरणासह नदीपात्राचा गंभीर ऱ्हास होत आहे.
या प्रकरणात शासकीय अथवा निमशासकीय कोणीही दोषी असल्यास त्यांच्यावरही नियमानुसार कठोर कारवाई केली जाणार आहे. जिल्ह्यातील अवैध रेती व्यवसाय पूर्णपणे रोखण्यासाठी सातत्याने धडक कारवाया सुरू राहतील.
या कारवाईनंतर गिरणा नदीकाठी अवैध वाळू उपसा करणाऱ्या व्यावसायिकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. पुढील काही दिवसांमध्ये आणखी कारवाया होण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे. गिरणा नदी पात्रात अवैध वाळू उपसा सुरू असल्याची तक्रार माहिती अधिकार कार्यकर्ते दीपक कुमार गुप्ता यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात दिली होती. त्यांनी दिलेल्या या तक्रारीवरून ही धडक कारवाई जिल्हा प्रशासनाने केले आहे


