रावेर : प्रतिनिधी
तालुक्यातील पाल येथे अज्ञात वाहनाच्या धडकेने सोनेरी कोल्हा ठार झाल्याची घटना नुकतीच घडलेली असताना, पाल-खरगोन महामार्गावर पुन्हा एक कोल्हा ठार झाला आहे. ही घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. आठ दिवसांत घडलेली ही दुसरी घटना आहे. नर कोल्ह्याला भरधाव वाहनाची धडक बसल्याचा अंदाज आहे. स्थानिकांनी याबाबत वनविभागाला तत्काळ माहिती दिली.
या घटनेमागे आणखी एक महत्त्वाचा मुद्दा समोर आला आहे. मध्यप्रदेशातून बकऱ्या आणि मेंढ्या ट्रकमधून आणल्या जातात. या प्रवासात गुदमरून मृत्यू झालेल्या बकऱ्या अनेकदा महामार्गालगत टाकल्या जातात. त्या खाण्यासाठी कोल्हे रस्त्याच्या दिशेने येतात आणि धावत्या वाहनांच्या धडकेत त्यांचे प्राण जात आहेत. महामार्गावर वन्यप्राण्यांच्या मृत्यूच्या वाढत्या घटना चिंताजनक असून प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची गरज अधोरेखित होत आहे.
अनेक वन्यप्राणी हे बऱ्याचदा रस्त्याकडे येत असतात. अशा वेळी वाहनासमोर अचानक आल्याने हे अपघात घडतात. अचानक प्राणी समोर आल्याने वाहनचालकालाही वाहन नियंत्रित करणे अवघड होते. यामुळे मात्र वन्य प्राण्यांचा जीव जातो. यावर तातडीने उपाययोजना करावी, अशी अपेक्षा वन्यप्रेमींची आहे


