नवी दिल्ली : वृत्तसंस्था
देशातील बिहार विधानसभा निवडणूक 2025 च्या मतमोजणी प्रक्रियेला वेग आला असून, सुरुवातीचे कल एनडीएच्या बाजूने स्पष्टपणे दिसत आहेत. दुपारपर्यंतचे ट्रेंड्स पाहता, एनडीएला २०० जागांवर आघाडी मिळाली असून, त्यांची वाटचाल बहुमताच्या पलीकडे असल्याचे चित्र आहे. दुसरीकडे, महागठबंधन अवघ्या ३९ जागांवर आघाडीवर असून, त्यांना मोठा धक्का बसला आहे.
या निवडणुकीत राष्ट्रीय पक्षाचा दर्जा परत मिळवण्याच्या आशेने उतरलेल्या अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस (अजित गट)ला मात्र अपेक्षेपेक्षा मोठा फटका बसला आहे. पक्षाच्या एकाही उमेदवाराला दखलपात्र कामगिरी करता आलेली नाही आणि डिपॉझिट जप्त होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसने देशभरात मजबूत पाया रचला होता. मात्र, पक्षफूटीनंतर राष्ट्रीय पक्षाचा दर्जा गमावल्यानंतर अजित पवार यांनी बिहारमध्ये 15 उमेदवार उतरवले होते. दुपारी १ वाजेपर्यंतच्या कलांनुसार, या उमेदवारांपैकी १३ जण मोठ्या फरकाने पिछाडीवर आहेत. बहुतांश उमेदवारांना ५०० मतांचाही टप्पा ओलांडता आलेला नाही. हे चित्र कायम राहिल्यास, बिहारमध्ये राष्ट्रवादीच्या सर्व उमेदवारांचे डिपॉझिट जप्त होण्याची शक्यता आहे.
बिहारमध्ये अजित पवारांच्या 15 उमेदवारांचा धुव्वा
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला बिहारमध्ये एकही आघाडी घेता आलेली नाही. जिंकणे तर दूरच, उमेदवारांना नाममात्र मते मिळाली असून, त्यांच्या डिपॉझिटवर संकट कोलमडले आहे. पक्षाने राष्ट्रीय दर्जा मिळवण्यासाठी हा प्रयत्न केला होता, पण अपेक्षित यश मिळाले नाही.



