मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. शिरूर कासार न्यायालयाने चित्रा वाघ यांच्या विरोधात वॉरंट जारी केले आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी दाखल केलेल्या अब्रूनुकसानीच्या प्रकरणात न्यायालयाने हे वॉरंट जारी केले असल्याची माहिती मेहबूब शेख यांचे वकील अंकुश कांबळे यांनी दिली आहे.
चित्रा वाघ यांनी मेहबूब शेख यांच्याबाबत बदनामीकारक वक्तव्य केल्याचा आरोप करण्यात आला आहे. मेहबूब शेख यांनी न्यायालयात अब्रूनुकसानीचा दावा दाखल केला होता. त्यानंतर या प्रकरणी न्यायालयाकडून वारंवार समन्स पाठवून देखील चित्रा वाघ हजर झाल्या नाहीत. त्यामुळे आता न्यायालयाने आज त्यांच्या विरोधात वॉरंट काढला असल्याची माहिती अंकुश कांबळे यांनी दिली आहे.
काय आहे प्रकरण?
भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी मेहबूब शेख यांच्यावर तरुणीचा छळ केल्याचा आरोप केला होता. चित्रा वाघ यांनी केलेल्या या कथित बदनामीकारक वक्तव्यामुळे पुढे हा वाद वाढला. त्यानंतर मेहबूब शेख यांनी चित्रा वाघ यांनी केलेल्या वक्तव्यांमुळे आपली प्रतिमा आणि अब्रू धुळीस मिळाल्याचा आरोप करत शिरूर कासार न्यायालयात अब्रूनुकसानीचा दावा दाखल केला होता. त्यानंतर न्यायालयाने चित्रा वाघ यांना वारंवार समन्स बाजावून देखील त्या न्यायालयात हजर झाल्या नव्हत्या. आज अखेर न्यायालयाने चित्रा वाघ यांच्या विरोधात वॉरंट जारी केले आहे. न्यायालयाने अनेक वेळा समन्स पाठवले, मात्र चित्रा वाघ यांनी प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे न्यायालयाने पुढील प्रक्रिया म्हणून वॉरंट जारी केले असल्याची माहिती शेख यांचे वकील अंकुश कांबळे यांनी दिली आहे.
मेहबूब शेख यांच्यावर एका तरुणीने बलात्कार केल्याचा आरोप केला होता. त्यानंतर चित्रा वाघ यांनी आक्रमक पवित्रा घेत त्या तरुणीच्या बाजूने लढा देत शेख यांच्यावर अनेक आरोप केले. परंतु, त्यानंतर काही दिवसातच या तरुणीने आपली भूमिका बदलत यू-टर्न घेतला. इतकेच नाही, तर या तरुणीने थेट चित्रा वाघ यांच्याच विरोधात तक्रार दाखल केली होती. त्यामुळे या प्रकरणाला वेगळेच वळण लागले होते.
या प्रकरणी चित्रा वाघ यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले होते की, राजकारणात काम करताना अशा घटना किंवा अनुभव नवीन नसतात. आम्ही त्या मुलीला पहिल्या दिवसापासून मदतच केली होती. आम्हाला जिथे-जिथे तपास यंत्रणा बोलावतील तिथे आम्ही गेलो आणि सहकार्य केले. असे काही अनुभव आले म्हणून आम्ही काम करणे थांबवले नाही. आम्ही काम करतच राहिलो. आम्हाला पूर्ण कल्पना होती, ज्या ठिकाणी अशी राजकीय धींड येतात त्या ठिकाणी अशा अडचणी उद्भवणे स्वाभाविक असते. त्यामुळे अशा अडचणींना सामोरे जाण्यास आमची तयारी होती.



