पुणे : वृत्तसंस्था
गेल्या काही दिवसांपूर्वी राज्यातील प्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकर महाराजांच्या मुलीचा साखरपुडा मोठ्या दिमाखात पार पडला. या कार्यक्रमाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच त्यावरून मोठ्या प्रमाणावर प्रतिक्रिया उमटू लागल्या. साधेपणाने विवाहसोहळे करावेत असा नेहमी संदेश देणाऱ्या महाराजांनी स्वतःच्या मुलीचा साखरपुडा मोठ्या थाटामाटात केला, अशी टीका काही नेटिझन्सनी केली. या टीकेत वैयक्तिक पातळीवरून उलटसुलट बोलणे सुरू झाल्याने इंदुरीकर महाराज मानसिक तणावात असल्याचे दिसून आले. अखेर एका कीर्तनात त्यांनी या प्रकरणाबद्दल मनातील वेदना व्यक्त करत कीर्तन सोडण्याचा विचार जाहीर केला. त्यामुळे त्यांच्या भक्तांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
या संपूर्ण घडामोडीवर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नेत्या रूपाली ठोंबरे पाटील यांनी समर्थकांचा सूर छेडत इंदुरीकर महाराजांना धीर देणारी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी फेसबुकवर लिहिलेल्या पोस्टमध्ये महाराजांना फेटा खाली ठेवू नका असा भावनिक संदेश दिला. रूपाली ठोंबरे पाटील यांनी म्हटले की, महाराजांनी वर्षानुवर्षे वारकरी समाजासाठी, महिलांसाठी आणि तरुणांसाठी अपार काम केले आहे. समाजप्रबोधनातून ते हजारो कुटुंबांना चांगल्या विचारांची दिशा देत आहेत. त्यामुळे सोशल मीडियावरील काही विकृत टिप्पणी करणाऱ्यांकडे लक्ष न देता महाराजांनी आपले कार्य सुरू ठेवावे, असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले.
पुढे बोलताना रूपाली ठोंबरे पाटील यांनी इंदुरीकर महाराजांवर होत असलेल्या टीकेचा जोरदार निषेध केला. अशा लोकांच्या शब्दांना किंमत देऊ नका, कारण ते समाजात अफवा आणि नकारात्मकता पसरवतात, असे मत त्यांनी व्यक्त केले. महाराजांना उद्देशून त्या म्हणाल्या की, तुम्ही घराघरात हरवलेल्या माणसांना योग्य मार्ग दाखवला आहे. तुमच्यासारखे लोक नसतील तर अनेकांचे आयुष्य अंधारात जाईल. तुमच्यासाठी महाराष्ट्र उभा आहे. तुम्ही डगमगू नये हीच आमची इच्छा. तसेच स्वतःला इंदुरीकर महाराजांच्या कुटुंबातील लेक म्हणत त्यांनी महाराजांना भावनिक आधार दिला.
दरम्यान, इंदुरीकर महाराजांनी कीर्तनात मांडलेली वेदना अनेकांना चटका लावून गेली. लोक आता माझ्या मुलीच्या कपड्यांवरून कमेंट्स करत आहेत. तुम्हाला माझ्यावर टीका करायची असेल तर करा, पण माझ्या मुलांवर टीका नका करू, असे ते म्हणाले होते. 31 वर्षे कीर्तनातून समाजसेवा करूनही आता व्यक्तीगत जीवनावर हल्ले होत असल्याने ते व्यथित असल्याचे त्यांनी सांगितले. मी दोन-तीन दिवसांत मोठा निर्णय घेईन, असे त्यांनी जाहीर करताच भक्तांमध्ये खळबळ उडाली. महाराज कीर्तन थांबवणार का? हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.



