पुणे : वृत्तसंस्था
पिंपरी-चिंचवडमधील चारोळीतील अलंकारपुरम 90 फूट रोडवर बुधवारी सायंकाळी झालेल्या थरारक हत्याकांडाने परिसरात खळबळ उडाली आहे. ओळखीतील दोघांनी व्यावसायिक नितीन शंकर गिलबिले (38, रा. वडमुखवाडी, चहोली) यांना फॉर्च्युनर कारमध्ये बसवून डोक्यात गोळी झाडत ठार केले. आरोपींनी मृतदेह रस्त्याच्या कडेला फेकून गाडी घेऊन पसार झाल्याची घटना संपूर्ण सीसीटीव्हीत कैद झाली आहे.
ही घटना सायंकाळी साडेपाच ते सहाच्या दरम्यान घडली. जमीन व्यवहार आणि हॉटेल व्यवसाय करणारे नितीन गिलबिले हे दोन ओळखीच्या व्यक्तींंसोबत कारमध्ये बोलत होते. काही वेळ कारबाहेर चर्चा झाल्यानंतर नितीन परत पुढच्या सीटवर बसताच आरोपींपैकी एकाने अचानक त्यांच्या डोक्यात गोळी झाडली. जागीच मृत्यू झाल्यानंतर आरोपींनी निपचित पडलेला मृतदेह कारमधून बाहेर फेकला. त्यांचे पाय कारच्या दरवाज्यात अडकले असतानाही आरोपींनी ओढून काढले आणि गाडी जोरात पळवली. कार नितीन यांच्या पायावरून गेल्याचेही सीसीटीव्हीत दिसते.
घटनेची माहिती मिळताच दिघी पोलिस आणि क्राइम ब्रँचची पथके घटनास्थळी दाखल झाली. प्राथमिक तपासात आरोपी अमित पठारे आणि विक्रांत ठाकूर यांची नावे समोर आली असून नितीन यांचे भाऊ सचिन गिलबिले यांनी फिर्याद दिली आहे. दिघी पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वैयक्तिक वादातून ही हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रमोद वाघ यांनी सांगितले की, आरोपींचा माग काढण्यासाठी पाच विशेष पथके तयार करण्यात आली आहेत. परिसरातील महत्त्वाचे सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल लोकेशन आणि संशयितांच्या संपर्कातील व्यक्तींची चौकशी सुरू आहे. आरोपी लवकरच पकडले जातील, असा पोलिसांचा विश्वास आहे.
नितीन गिलबिले हे चारोळी-चहोली परिसरातील परिचित व्यावसायिक होते. त्यांनी अलंकारपुरम रस्त्याव र अलीकडेच हॉटेल सुरू केले होते तसेच व्यावसायिक गाळे बांधून भाडेकरूंना दिले होते. बुधवारी खडी मशीन रस्त्यावर लोकांशी बोलत असताना आरोपी त्यांना कारमध्ये घेऊन गेले. काही मिनिटांतच कारमधील वाद वाढत गेला आणि परिस्थिती थेट खूनापर्यंत पोहोचली.या हत्याकांडानंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये मोठी दहशत पसरली आहे.



