जळगाव : प्रतिनिधी
जळगाव शहर पोलिसांनी आज (दि. १४) पहाटे ४ ते ७ वाजेच्या दरम्यान मोठ्या प्रमाणात ‘महा-कॉम्बिंग ऑपरेशन’ राबवून विविध गुन्ह्यांमध्ये रेकॉर्डवरील १०४ गुन्हेगारांना ताब्यात घेतले. उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या नेतृत्वाखाली जळगाव शहर, एमआयडीसी, शनिपेठ आणि रामानंद नगर पोलिस स्टेशनच्या हद्दीत ही कारवाई करण्यात आली.
गेल्या काही दिवसांपासून शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणाऱ्या आणि गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्याच्या निर्णयानुसार ही मोहिम राबविण्यात आली. पहाटे सर्व पोलिस पथकांनी एकाच वेळी गुन्हेगारांची वस्त्या, घरे आणि लपण्याची ठिकाणे याठिकाणी छापे घातले आणि रेकॉर्डवरील गुन्हेगारांची तपासणी करून त्यांना ताब्यात घेतले.
या कारवाईत LCB चे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड, एमआयडीसीचे निरीक्षक बबन आव्हाड, रामानंद नगरचे निरीक्षक राजेंद्र गुंजाळ, शनिपेठचे निरीक्षक कावेरी कमलाकर, शहर पोलिस स्टेशनचे एपीआय सुरेश आव्हाड यांसह मोठा पोलिस बंदोबस्त सहभागी झाला होता.
ताब्यात घेतलेल्या सर्व १०४ जणांना जिल्हा पेठ परिसरातील मोकळ्या जागेवर आणून त्यांची तपासणी करण्यात आली. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांनी सर्वांना भविष्यात कोणत्याही गुन्हेगारी कृत्यात आढळल्यास थेट तडीपारीची कारवाई करण्यात येईल, असा इशारा दिला. त्यानंतर सर्वांकडून समजपत्र घेऊन त्यांना सोडण्यात आले.


