धरणगाव : प्रतिनिधी
तालुक्यातील पाळधी येथून जवळच असलेल्या मुसळी गावाजवळ गुरुवारी पहाटे चौघांनी पांढऱ्या रंगाची हुंडाई कार रस्त्यात आडवी लावून नंदुबार येथील शंकर बामणी व धनंजय पाटील व इतर कामगारांना गाडीतून बाहेर ओढून मारहाण केली. तसेच त्यांच्या ताब्यातील ३० हजार रुपये घेवून पोबारा केला होता. धरणगाव पोलिसांनी या प्रकरणात केवळ चारच तासात चारही संशयितांसह गाडी व मुद्देमाल जप्त केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, खामगाव येथून कन्स्ट्रक्शनच काम आटोपून नंदुरबारकडे जाणारे ठेकेदार शंकर बामणी यांच्यासोबत फिर्यादी धनंजय शंकर पाटील (रा. खोंडामळी, जि. नंदुरबार) हे त्यांच्या वाहन (एमपी १३, झेडयू- ९४४०) ने जात असताना मुसळी फाट्यावर १२ नोव्हेंबरला ते जेवणासाठी अर्जुना हॉटेलला थांबले. जेवण केल्यानंतर रात्री ११.१५ वाजेच्या सुमारास ते मार्गस्थ झाले. दरम्यान, मुसळी गावाजवळ चौघांनी पांढऱ्या रंगाच्या हुंडाई कार रस्त्यावर आडवी लावून शंकर बामणी व धनंजय पाटील व सोबत असलेल्या कामगारांना गाडीतून बाहेर ओढून मारहाण केली. तसेच त्यांच्या ताब्यातील ३० हजार रुपये बळजबरीने काढून पोबारा केला. दरम्यान, धरणगाव पोलीस ठाण्याचे पो.नि. सुनील पवार, पाळधी पोलीस चौकीचे स.पो. नि. प्रशांत कंडारे, पीएसआय संतोष पवार, पो.हे.कॉ. महेंद्र बागुल, समाधान भागवत, सुधीर चौधरी, संदीप पाटील, किशोर भोई हे रात्री गस्तीवर असताना त्यांना ही माहिती मिळाली. त्यांना तक्रारदारांनी आरोपींचे वर्णन व माहिती सांगितली.
त्यानंतर अवघ्या ४ तासात आरोपी सुनील अशोक कुऱ्हाडे, विजय मेवालाल मोहिते यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. तर सखोली चौकशी केल्यानंतर गुन्ह्यात वापरलेले वाहन (एमएच – १४, एलएक्स – ८५१५) व मुसळी येथील गणेश अहिरे व कृष्णा राठोड यांना ताब्यात घेतले. दरम्यान, १३ रोजी पहाटे ५.३० वाजता गुन्हा दाखल करून त्यांच्या जवळून एकूण ३९ हजार ७०० रुपये पोलिसांनी जप्त केले आहेत. तपास पाळधी पोलीस चौकीचे स.पो.नि. प्रशांत कंडारे करत आहेत


