रावेर : प्रतिनिधी
जिल्ह्यातील अनेक ठिकाणी नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्थिर सर्वेक्षण पथकाने एका कारमधून २ लाख ५६ हजार रूपयांची रोकड जप्त केली. गुरुवारी दुपारी ३:३० वाजेच्या सुमारास जिल्ह्यातील पहिलीच धडक कारवाई सावदा रोडवरील शासकीय विश्रामगृहासमोर करण्यात आली.
न.पा. निवडणुकीच्या अनुषंगाने बन्हाणपूर अंकलेश्वर राष्ट्रीय महामार्गावर सावद्याकडून येणाऱ्या वाहनांची शासकीय नवीन विश्रामगृहासमोर स्थापन करण्यात आलेल्या स्थिर सर्वेक्षण पथकाकडून तपासणी गुरुवारी सुरू होती भुसावळहून बन्हाणपूरकडे जाणाऱ्या चारचाकी वाहन क्र. (एम एच-१९ /सी. एफ. – २३८५) पथकाने तपासणी केली असता त्यात वरील रक्कम आढळून आली. व्यापारी कुशल सुनील अग्रवाल (रा. वरणगाव रोड, भुसावळ) यांनी ही रक्कम घेऊन ब-हाणपूर येथील व्यापाऱ्याकडे सोयाबीन खरेदीसाठी जात असल्याचे पथकाला सांगितले. मात्र, सोयाबीन खरेदीसाठी जात असल्याबाबत कोणत्याही प्रकारचे दस्तावेज त्यांच्याकडे आढळून आले नाहीत. यावर पथकाने पंचनामा करुन रोकड जप्त करण्याची कारवाई केली.
सर्वेक्षण पथकाचे प्रमुख तथा सहकार अधिकारी डी. व्ही. धनगर, पोकों तथागत सपकाळे, कॅमेरामन समीर तडवी यांनी ही तपासणी केली, तसेच पथकाने पोलिस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल, निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार बंडू कापसे यांच्यासमक्ष पंचनामा करण्यात आला. सहायक निवडणूक निर्णय अधिकारी सतीश पुदाके यांनी ही रोकड सीलबंद करून जिल्हा कोषागार कार्यालयात जमा करण्यासाठी रवाना केली


