वडीगोद्री : वृत्तसंस्था
राज्यातील महायुती सरकारमधील अजित पवार गटाचे नेते व आमदार धनंजय मुंडें यांना चौकशीला आणा, नसता महागात पडेल असा इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांना दिला. अंतरवाली सराटी येथे पञकारांशी बोलताना आ. धनंजय मुंडे यांची पाठराखण करण्याच्या भूमिकेवरून जरांगे पाटलांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही थेट लक्ष्य केले.
ते पुढे म्हणाले की, तुम्ही किती दिवस पदराआड लपवणार, तो आमचा घात करायला निघाला, त्याला ओबाळीता, चोबळता का? मला यात राजकारण आणावयाचे नाही. हे पाप तुमच्यासाठी चांगले नाही. हे प्रकरण खूप मोठं आहे, हा लहान विषय नाही. चेष्टेवर घेण्याचा विषय नाही. सामूहिक कट रचला गेला आहे. मुख्यमंत्र्यांनी याकडे लक्ष घालणे गरजेचे आहे. जरांगे यांनी या प्रकरणाच्या तपासासाठी जालना पोलीस अधीक्षक बन्सल यांच्यावर पूर्ण विश्वास व्यक्त केला.
जरांगे पाटलांनी हत्येच्या कटाचे आरोप असलेले आ. धनंजय मुंडे यांना थेट आव्हान दिले. धनंजय मुंडे यांनासुद्धा चौकशीला आणले पाहिजे, कारण त्यांनीच हे घडून आणले आहे. मी खोटं बोलत नाही. नार्को टेस्ट करायची म्हटल्यावर हा खरकटा कुठे गेला? आता नार्को टेस्टला निघायचं तर तुझ्याकडे पैसे नाहीत तर आम्ही शेत विकतो, शहाणपणा करायचा नाही. तू पाप करणार आणि गोरगरिबांना रस्त्यावर उतरोवणार का? नार्को टेस्ट करायला चल, असे यावेळी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील म्हणाले.


