मुंबई : वृत्तसंस्था
राज्यात स्थानिक निवडणुकीची रणधुमाळी सुरु असताना आता नगरपालिका आणि नगरपंचायतींसाठी मतदानाच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी पुन्हा एकत्र येण्याच्या तयारीत असल्याची चिन्हे आहेत. शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे स्थानिक निवडणुकांमध्ये एकत्र येण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही राष्ट्रवादी गटांमध्ये संवाद सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.
आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने अजित पवार आणि त्यांच्या भगिनी सुप्रिया सुळे यांच्यात एकत्र येण्याबाबत चर्चा झाली असल्याची माहिती पिंपरी-चिंचवडमधील अजित पवार गटाचे शहराध्यक्ष योगेश बहल यांनी ‘एबीपी माझा’शी बोलताना दिली आहे. अजित पवार आणि सुप्रिया सुळे या भाऊ-बहिणींचा एकत्र येण्याबाबत संवाद झाला आहे. अजित दादा लवकरच शरद पवार यांच्याशी याबद्दल अंतिम चर्चा करणार असल्याचा दावा योगेश बहल यांनी केला आहे. आगामी महापालिका निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत मी अजित दादांशी चर्चा केली, त्यावेळी स्वतः अजित पवारांनी ही माहिती दिल्याचेही बहल यांनी म्हटले आहे.
दरम्यान, गेल्या काही दिवसांत दोन्ही राष्ट्रवादी काही ठिकाणी स्थानिक निवडणुकांमध्ये एकत्र काम करताना दिसले आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड नगरपालिका निवडणुकीत दोन्ही गटांनी युती केली असून, यासाठी कॅबिनेट मंत्री हसन मुश्रीफ यांनी मध्यस्थी केली असल्याचे समजते. अशाच प्रकारे बीड आणि सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुका येथेही दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्याचे चित्र दिसून आले आहे. तर दुसरीकडे जळगाव जिल्ह्यात देखील भाजपला रोखण्यासाठी गरज भासल्यास आम्ही शिंदे गटासह अजितदादांच्या गटाशी युती करू, असे संकेत शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटील यांनी केले होते.
दरम्यान, राज्याच्या राजकारणात ‘राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी’ अशी परिस्थिती निर्माण झाल्यानंतर आता ‘राष्ट्रवादी एकत्र’ या नव्या समीकरणामुळे राजकीय रंगत वाढली आहे. येत्या काही दिवसांत अजित पवार आणि शरद पवार या दोघांमधील चर्चेनंतर यावर अधिकृत निर्णय होण्याची शक्यता आहे.


