नवी दिल्ली : वृत्तसंस्था
देशभरातील असंख्य शेतकाऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा २१ वा हप्ता लवकरच जारी होणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. आज बुधवार, १२ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर या हप्त्याबाबत घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
गेल्या २ ऑगस्ट २०२५ रोजी २० वा हप्ता जाहीर करण्यात आला होता, ज्यामध्ये २०,५०० कोटी रुपयांची रक्कम देशभरातील ९.७ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात थेट जमा करण्यात आली होती. यानंतर नोव्हेंबर महिन्यात २१ वा हप्ता जमा होणार असल्याची अपेक्षा आहे. केंद्र सरकारकडून याबाबत तयारी सुरू असून देशभरातील पात्र शेतकऱ्यांना हप्ता थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केला जाणार आहे.
दरम्यान, अतिवृष्टी, महापूर आणि जमीन खचल्याने उत्तर भारतातील पंजाब, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमधील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने २६ सप्टेंबर रोजी या राज्यांतील पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात २१ व्या हप्त्यांतर्गत ५४० कोटी रुपयांहून अधिक निधी थेट पाठवला आहे.
पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा लाभ फक्त पात्र शेतकऱ्यांनाच मिळणार असून, लाभार्थ्यांची नावे केंद्राच्या यादीत नसल्यास संबंधितांना हप्ता मिळणार नाही. योजनेचा लाभ मिळणार आहे की नाही हे जाणून घेण्यासाठी pmkisan.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ‘Farmer Corner’ → ‘Beneficiary List’ या पर्यायांवर क्लिक करून आधार क्रमांक किंवा खाते क्रमांक टाकल्यास लाभ स्थिती तपासता येते.
योजनेच्या नवीन नियमावलीनुसार सरकारी नोकरीतील, सेवानिवृत्त (पेन्शनधारक) तसेच आयकर भरणारे शेतकरी या योजनेपासून वंचित राहतील. दरम्यान, एकाच कुटुंबातील पती, पत्नी, मुलगा किंवा मुलगी सर्वांनी या योजनेचा लाभ घेत असल्यास आता फक्त एका सदस्यालाच हा लाभ मिळणार असून उर्वरितांची नावे यादीतून वगळण्यात येणार आहेत.
केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली होत असून, बैठकीनंतर पीएम किसान योजनेच्या २१ व्या हप्त्याची अधिकृत घोषणा अपेक्षित आहे. त्यामुळे देशभरातील कोट्यवधी शेतकऱ्यांचे लक्ष आजच्या बैठकीकडे लागले आहे.


