चाळीसगाव : प्रतिनिधी
धुळे-चाळीसगाव राष्ट्रीय महामार्गावर भोरस गावाजवळ भरघाव वेगाने जाणाऱ्या ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात चाळीसगाव तालुक्यातील पिराचे बोरखेडा येथील भागवत पाटील या दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, ट्रकने (एचआर ७४-बीओ ४५०) दुचाकीला जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला. या अपघातात दुचाकी ट्रकच्या पुढील भागात अडकून अक्षरशः चिरडली गेली. अपघात इतका भीषण होता, की भागवत पाटील यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. घटनेनंतर काहीवेळ महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. घटना घडताच स्थानिक नागरिकांनी तत्काळ चाळीसगाव ग्रामीण पोलिसांना कळविले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न केले. अपघाताचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे


