चोपडा : प्रतिनिधी
राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची धामधूम सुरु असताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाला जळगाव जिल्ह्यात मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व महाराष्ट्र विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी यांनी समर्थक आणि पदाधिकाऱ्यांसह अजित पवार गटात प्रवेश केला आहे.
मुंबई येथे मंगळवारी पार पडलेल्या या भव्य प्रवेश सोहळ्याला उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते. यावेळी मंत्री माणिकराव कोकाटे, नरहरी झिरवाळ, धनंजय मुंडे, आमदार अनिल पाटील, माजी आमदार कैलास पाटील, सूरज चव्हाण, आनंद परांजपे, प्रतिभा शिंदे, तसेच जिल्हाध्यक्ष उमेश नेमाडे आणि संजय पवार आदी मान्यवर उपस्थित होते.
या प्रवेशावेळी चोपडा तालुक्यातील अनेक नामांकित पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी देखील अजित पवार गटात प्रवेश केला. त्यात चोसाका माजी अध्यक्ष अॅड. घनश्याम पाटील, जि.प. माजी सदस्या इंदिरा पाटील, चोपडा पीपल्स बँकेचे अध्यक्ष चंद्रहास गुजराथी, उद्योजक सुनील जैन, तालुकाध्यक्ष शशिकांत पाटील, चोसाका संचालक शशिकांत देवरे, माजी सभापती कांतीलाल पाटील, कल्पना पाटील, सूतगिरणी उपाध्यक्ष प्रल्हाद पाटील, माजी नगरसेवक भूपेंद्र गुजराथी, विनायक पाटील आणि शेतकी संघ अध्यक्ष सुनील पाटील यांचा समावेश आहे. अरुणभाई गुजराथी यांच्या प्रवेशामुळे जळगाव जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजकारणात नवे समीकरण निर्माण झाले असून, आगामी स्थानिक निवडणुकांवर या घडामोडीचा थेट परिणाम होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे.


