अमळनेर : प्रतिनिधी
शहरासह विविध ठिकाणी दुचाकी चोरणाऱ्या शहादा तालुक्यातील दोघांना अमळनेर पोलिसांनी शिताफिने अटक करून त्यांच्याकडून १५ लाख ६३ हजारांच्या २४ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. अमळनेर पोलिसांना या उत्तम कामासाठी विशेष बक्षीस देण्यात येत आहे, अशी माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
अमळनेर शहरासह विविध ठिकाणाहून दररोज दुचाकी चोरीस जात होत्या. यामुळे पोलिसांसह सामान्य नागरिक त्रस्त झाले होते. दरम्यान, अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर आणि डीवायएसपी विनायक कोते यांच्या मार्गदर्शनात पो. नि. दत्तात्रय निकम यांनी गुन्हे शोध पथकातील पोलीस उपनिरीक्षक शरद काकळीज, प्रशांत पाटील, गणेश पाटील, उज्ज्वलकुमार म्हस्के, नितीन मनोरे, उज्ज्वल पाटील, हितेश बेहरे यांच्या पथकाला तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपींचा शोध घेण्यासाठी रवाना केले. पोलीस पथकाने विविध ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी करून आरोपींचे चेहरे निष्पन्न केले. हे दोन्ही आरोपी नंदुरबार जिल्ह्यातील असल्याचे समजले. त्यानंतर शहादा तालुक्यातील सातपिंप्री येथील हिंमत रेहंज्या पावरा व अंबालाल भुरट्या खर्डे अशी त्यांची ओळख पटली. हे आरोपी जंगलातून विविध ठिकाणी जात असल्याने पोलिसांना मोठी पायपीट करावी लागली. मात्र, पोलिसांनी माहितीच्या आधारे त्यांचा पाठलाग सुरुच ठेवला व त्यांना धडगाव येथून ताब्यात घेतले.
पोलिसांनी त्यांना खाक्या दाखवताच त्यांनी विविध ठिकाणाहून १५ लाख ६३ हजार रुपयांच्या २४ दुचाकी चोरल्याची तसेच अनेक गरीब लोकांना त्या विकल्याची कबुली दिली. पोलिसानी संपूर्ण जंगलातून सर्व २४ दुचाकी हस्तगत केल्या आहेत. या दोन्ही आरोपींना न्यायालयाने ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. तर या दोघा चोरट्यांकडून मोठ्या प्रमाणावर दुचाकी आणि जंगलातून आरोपी पकडून आणल्याने जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी अमळनेर पोलिसांचे कौतुक करुन रोख रकम्म बक्षीस म्हणून दिली. तपास हे. कॉ. काशिनाथ पाटील, सागर साळुंखे करत आहेत. या पत्रकार परिषदेला डीवायएसपी विनायक कोते, पो.नि. दत्तात्रय निकम, पो.उ.नि. समाधान गायकवाड व शरद काकळीज हजर होते.


