पारोळा : प्रतिनिधी
तालुक्यातील पळासखेडे खुर्द येथे ५२ वर्षीय शेतकऱ्याने कापसाच्या नापिकी व कर्जाला कंटाळून विषारी पदार्थ सेवन केल्याची घटना ४ रोजी घडली होती. उपचारादरम्यान त्यांचा १० रोजी दुर्दैवी मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, पळासखेडे खुर्द येथील प्रताप दौलत पाटील (वय ५२) हे आपल्या शेतात कापसाच्या पिकाला फवारणी करत होते. फवारणी करताना कापसाची अत्यंत खराब झालेली स्थिती तसेच खर्च केलेले पैसेही येणार नाहीत व कापसाला भावही नसल्याने कर्जाचा वाढणारा बोजा, याच नैराश्यातून त्यांनी फवारणीचे औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. यादरम्यान त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तर उपचारादरम्यान १० रोजी दुपारी २ वाजता प्रताप पाटील यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. याबाबत पारोळा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.


