मुंबई : प्रतिनिधी
बॉलिवूडचे ज्येष्ठ आणि लोकप्रिय अभिनेते धर्मेंद्र यांची प्रकृती सोमवारी अचानक बिघडल्याने त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, श्वास घेण्यास त्रास होत असल्याने त्यांना सध्या व्हेंटिलेटर सपोर्टवर ठेवण्यात आले आहे. डॉक्टरांची एक विशेष टीम त्यांच्या प्रकृतीवर सतत लक्ष ठेवून असून, पुढील ७२ तास अत्यंत निर्णायक ठरणार असल्याचे सांगितले जात आहे.
धर्मेंद्र यांच्या प्रकृतीबाबत अद्याप रुग्णालयाकडून किंवा कुटुंबीयांकडून कोणतेही अधिकृत निवेदन जारी करण्यात आलेले नाही. त्यांच्या मुलींना अमेरिकेतून तातडीने मुंबईत बोलावण्यात आले आहे, तर कुटुंबातील सदस्य रुग्णालयात उपस्थित आहेत.
अलिकडेच धर्मेंद्र यांच्या आगामी “इक्किस” या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला होता, ज्यामध्ये त्यांनी दमदार अभिनय साकारला आहे. त्यांच्या या वयातही असलेल्या फिटनेस आणि ऊर्जा याचे नेहमीच कौतुक केले जाते. भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासात धर्मेंद्र यांना सर्वात देखणे आणि लोकप्रिय अभिनेता म्हणून ओळखले जाते. एकदा सुप्रसिद्ध अभिनेता देव आनंद यांनी धर्मेंद्र यांना पाहून म्हटले होते, “माझा असा चेहरा का नाही?” तर दिलीप कुमार यांनी एकदा त्यांच्या तेजस्वी व्यक्तिमत्त्वाचे कौतुक करत म्हटले होते की, “मला पुढील जन्मात धर्मेंद्रसारखे व्यक्तिमत्त्व हवे आहे.”
८ डिसेंबर १९३५ रोजी पंजाबमधील लुधियाना जिल्ह्यातील साहनेवाल गावात धर्मेंद्र यांचा जन्म झाला. दिलीप कुमार यांच्या अभिनयाने प्रेरित होऊन त्यांनी चित्रपटसृष्टीत प्रवेश केला. दहावीत असतानाच त्यांनी दिलीप कुमार यांचा ‘शहीद’ हा चित्रपट पाहिला आणि तेथूनच अभिनयाची प्रेरणा मिळाली. धर्मेंद्र यांनी त्यांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत ‘शोले’, ‘चुपके चुपके’, ‘सीता और गीता’, ‘धर्मवीर’, ‘अपने’ यांसारख्या अनेक गाजलेल्या चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या मनावर अमीट ठसा उमटवला आहे.


