मुंबई : वृत्तसंस्था
गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळ्या मुद्यांवर बेधडक विधाने करून स्वपक्षाची राजकीय कोंडी करणाऱ्या रूपाली पाटील व आमदार अमोल मिटकरी यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्ते पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. रूपाली पाटील यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकरणकर यांच्यावर तिखट हल्ला चढवला होता. तर मिटकरी यांच्या विधानांमुळे सत्ताधारी महायुतीत तणाव निर्माण होताना दिसून येत होता. परिणामी राष्ट्रवादी काँग्रेसने या दोघांनाही प्रवक्ते पदावरून दूर करून स्वतःची सुटका करून घेण्याचा प्रयत्न केला.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृ्त्वातील राष्ट्रवादी काँग्रेसने सोमवारी पक्षाच्या 17 नव्या प्रवक्त्यांची यादी जाहीर केली. त्यात रूपाली पाटील व अमोल मिटकरी या 2 नेत्यांची नावे नाहीत. या यादीद्वारे राष्ट्रवादीने अनिल पाटील, चेतन तुपे, सना मलिक, हेमलता पाटील, राजीव साबळे, सायली दळवी, रूपाली चाकणकर, आनंद परांजपे, राजलक्ष्मी भोसले, प्रतिभा शिंदे, प्रशांत पवार, शशिकांत तरंगे, ब्रिजमोहन श्रीवास्तव, अविनाश आदिक, सुरज चव्हाण, विकास पासलकर व श्याम सनेर यांच्यावर प्रवक्तेपदाची जबाबदारी सोपवली आहे. या नव्या नियुक्त्यांसह जुन्या प्रवक्त्यांच्या नियुक्त्या रद्द करण्यात आल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी या निवेदनाद्वारे स्पष्ट केले आहे.
रूपाली पाटील यांनी फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणात अत्यंत आक्रमक भूमिका घेतली होती. या प्रकरणी त्यांनी थेट राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांच्यावर मृत महिला डॉक्टरचे चारित्र्यहनन करण्याचे आरोप केले होते. चाकणकर या राष्ट्रवादीच्याच नेत्या आहेत. यामुळे रूपाली पाटील यांच्या आरोपांमुळे एकप्रकारे राष्ट्रवादीचीच गोची झाली होती. त्यामुळे पक्षाने रूपाली पाटील यांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती. या नोटीशीला पाटील यांनी कायदेशीर उत्तर देण्याचे सूतोवाच केले होते. पण त्यांचे उत्तर मिळण्यापूर्वीच पक्षाने त्यांची प्रवक्तेपदावरून हकालपट्टी केली. त्यामुळे रूपाली पाटील या प्रकरणी पुढे काय भूमिका घेतात? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
अमोल मिटकरी हे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांचे निकटवर्तीय मानले जातात. त्यांनी पार्थ पवार यांच्या प्रकरणातही पक्षाची जोरकसपणे भूमिका मांडली होती. पण त्यांच्या काही टोकाच्या भूमिकांमुळे सत्ताधारी महायुतीत मतभेद निर्माण होण्याची स्थिती येत होती. त्यामुळे पक्षाने त्यांना प्रवक्तेपदापासून तूर्त दूर ठेवण्याचा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत आहे.


