मुंबई : वृत्तसंस्था
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जवळच्या व्यक्तीवर कारवाई होत नाही. पण ज्यांचा राजकीय गेम करायचा आहे त्याच्यावर मात्र कारवाई होते. सरकारच्या एका विभागाने सांगून सुद्धा मी समोर आणलेल्या सिडको घोटाळ्याप्रकरणी कारवाई झाली नाही, पण पार्थ पवार यांच्या प्रकरणी सुपरफास्ट कारवाई केली जात आहे, असा भेदभाव न करता कारवाई करण्यात यावी असे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी म्हटले आहे.
रोहित पवार म्हणाले की, जो व्यक्ती चुकीचा आहे त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. सिडकोचे प्रकरण असो की नवी मुंबईमधील खडीचे प्रकरण असो की नाशिकमधील जमिनीचे प्रकरण, शिरसाट यांच्या एमआयडीसीचा मुद्दा असे अनेक मुद्दे आहेत. ज्या काही सरकारी जमिनी आहेत किंवा कुळाच्या जमिनी आहेत कुणाच्याच नावाने होत नाही त्यावर ज्यांनी ज्यांनी ताबा घेतला आहे किंवा त्यावर घातले आहे अशा सर्वांवर कारवाई करण्यात यावी.
रोहित पवार म्हणाले की, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने बैठक आयोजित करण्यात आली आहे. जिल्हा पातळीवर योग्य निर्णय वाटत असेल त्या संदर्भात काय निर्णय घ्यायचा या संदर्भात आजच्या बैठकीत चर्चा होणार आहे. जिल्हा अध्यक्षांनी योग्य वाटणारा निर्णय घ्यावा पण प्रदेशला तशी माहिती द्यावी. केवळ भाजपसोबत जायचे नाही अशी आमची भूमिका आहे. प्रमुख मनपाच्या बाबतीमध्ये मात्र सर्व नेते बसून निर्णय घेऊ असे आम्हाला वाटत आहे.
रोहित पवार म्हणाले की, संजय शिरसाट यांनी जो 5 हजार कोटी रुपयांचा घोटाळा केला त्यावर बोलावे. त्यांच्याबद्दल तुम्ही तोंड उघडत नाही आणि नको त्या विषयावर जर तुम्ही तोंड उघडत असाल तर एकदा समोरा-समोर येऊ द्यात. गेली 8 दिवस माझी तब्येत खराब होती म्हणून मी काही बोललो नाही.पार्थ पवार प्रकरणी त्यामुळेच माझी काही प्रतिक्रिया दिसली नाही. कुठलीही जर गोष्ट कायदेशीर नसेल तर तुमच्यावर कारवाई झाली पाहिजे, त्यामध्ये खरे काय खोटे काय हे लोकांसमोर आले पाहिजे. कुठलाही निर्णय एकटा व्यक्ती घेत नसतो. अधिकारी गरिबांची कामे का करत नाही. कारवाई होत असताना त्यात भेदभाव होऊ नये.


