मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्षांसाठी दिलासा देणारा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य निवडणूक आयोगाने पक्षांच्या मागणीचा सकारात्मक विचार करून स्टार प्रचारकांची मर्यादा २० वरून वाढवून ४० करण्यात आली आहे.
१४ ऑक्टोबर २०२५ रोजी झालेल्या बैठकीत विविध पक्षांच्या प्रतिनिधींनी ही मागणी केली होती. त्यांनी सांगितले की, राज्यभर होणाऱ्या निवडणुकांमध्ये विविध ठिकाणी प्रचार मोहीमा राबवाव्या लागतात, त्यामुळे फक्त २० प्रचारकांची मर्यादा अपुरी ठरत होती. अखेर आयोगाने महाराष्ट्र राज्य राजकीय पक्ष नोंदणी, विनियमन आणि निवडणूक चिन्ह आदेश, २०२५ मधील परिच्छेद २६ नुसार ही वाढ मंजूर केली आहे.
आयोगाने स्पष्ट केले आहे की प्रत्येक पक्षाने आपल्या ४० प्रचारकांची सुधारित यादी संबंधित जिल्हाधिकारी किंवा महानगरपालिका आयुक्तांकडे निश्चित वेळेत सादर करणे आवश्यक असेल. या निर्णयामुळे प्रचार मोहीम अधिक व्यापक, संघटित आणि लोकाभिमुख होणार असून मोठ्या तसेच प्रादेशिक पक्षांना यातून मोठा फायदा होईल.


