नवी दिल्ली : वृत्तसंस्था
जम्मू आणि काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यातील केरन सेक्टरमध्ये शनिवारी सुरक्षा दलांनी दोन दहशतवाद्यांना ठार केले. नियंत्रण रेषेवरून (एलओसी) घुसखोरी होत असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर भारतीय लष्कराने शुक्रवारी दहशतवाद्यांवर शोध मोहीम सुरू केली.
भारतीय लष्कराच्या चिनार कॉर्प्स या युनिटने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर म्हटले आहे की, शोध मोहिमेदरम्यान दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार केला. सुरक्षा दलांनी प्रत्युत्तर देत दोन दहशतवाद्यांना ठार केले. लष्कराने याला “ऑपरेशन पिंपल” असे नाव दिले आहे. ही कारवाई अजूनही सुरू आहे. याआधी ५ नोव्हेंबर रोजी जम्मू आणि काश्मीरमधील किश्तवाड जिल्ह्यातील चतरू भागात चकमक झाली होती. दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात एक सैनिक जखमी झाला होता. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, पोलिसांनी सैन्याच्या मदतीने दहशतवाद्यांवर संयुक्त कारवाई सुरू केली.
१३ ऑक्टोबर रोजी जम्मू आणि काश्मीरमधील कुपवाडा येथे सुरक्षा दलांनी दोन दहशतवाद्यांना ठार मारले. ही कारवाई भारत-पाकिस्तान सीमेजवळील (LOC) कुंभकडी जंगलात झाली. दहशतवाद्यांनी तेथून घुसखोरीचा प्रयत्न केला होता, परंतु सुरक्षा दलांनी तो प्रयत्न हाणून पाडला. जम्मूच्या आरएस पुरा सेक्टरमधील आंतरराष्ट्रीय सीमेवर एका पाकिस्तानी घुसखोराला अटक करण्यात आली. पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील सरगोधा येथील रहिवासी असलेल्या सिराज खान असे या घुसखोराचे नाव असून, त्याला ऑक्ट्रोय चौकीवर तैनात असलेल्या बीएसएफ जवानांनी पाहिले. काही गोळीबारानंतर त्याला सीमेवरील कुंपणाजवळ अटक करण्यात आली. त्याच्या ताब्यातून काही पाकिस्तानी चलनही जप्त करण्यात आले.


