मुंबई : वृत्तसंस्था
मराठा आरक्षणासाठी गेल्या काही वर्षांपासून लढा देणारे आंदोलन नेते मनोज जरांगे पाटील यांनी आज पत्रकार परिषद घेऊन केलेल्या गंभीर आरोपामुळे राज्यातील राजकारणात एकच खळबळ उडाली आहे.
जरांगे यांनी दावा केला आहे की, त्यांच्या हत्येचा कट माजी मंत्री आणि आमदार धनंजय मुंडे यांनी रचला असून, त्यासाठी अडीच कोटी रुपयांची कॉन्ट्रॅक्ट किलिंगची ऑफर देण्यात आली होती.
जालना पोलिसांनी या प्रकरणी दोन संशयितांना ताब्यात घेतले असून, या कटामागे एका बड्या नेत्याचा पीए आणि कार्यकर्त्यांचा सहभाग असल्याचे समोर आले आहे. जरांगे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, “बीडच्या मोठ्या नेत्याच्या पीए कांचन या व्यक्तीने आरोपींकडे संपर्क साधला. त्यांनी मला अपघातासारखे दाखवून ठार मारण्याचा प्लॅन तयार केला. गाडीने गाडी धडकवून अपघात घडवण्याची योजना करण्यात आली होती.” या आरोपानंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, पोलीस याप्रकरणाचा तपास अधिक गतीने करत आहेत.


