पुणे : वृत्तसंस्था
राज्यात गेल्या दोन दिवसापासून अजित पवारांचे पुत्र मोठ्या चर्चेत आले असताना आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्याशी संबंधित पुण्यातील जमीन व्यवहारात ६ कोटी रुपयांचा मुद्रांक शुल्क बुडविल्या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात गुन्हा दाखल झाला आहे, पण यामध्ये पार्थ पवार यांचे आणि त्यांच्या कंपनीचे नाव वगळण्यात आले आहे, असा आरोप विरोधी नेते अंबादास दानवे यांनी केला आहे.
कोरेगाव पार्क या हायप्रोफाईल आयटी पार्क परिसरात घनदाट वनउद्यान असलेली सुमारे १,८०० कोटी रुपये बाजारमूल्याची ४० एकर शासकीय जमीन सरकारी यंत्रणांना हाताशी धरून पार्थ पवार यांच्या कंपनीला केवळ ३०० कोटींना विकण्यात आल्याचा व त्याद्वारे कोट्यवधीची स्टॅम्प ड्युटी बुडविल्याचा आरोप विरोधी नेते अंबादास दानवे आणि ‘उबाठा’ पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला आहे. यामुळे पार्थ हे अडचणीत आले आहेत. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याप्रकरणी प्राथमिक चौकशीचे आदेश दिले आहेत. दरम्यान, याप्रकरणी खरेदीखत नोंदविताना मुद्रांक शुल्काची हानी आणि अनियमितता केल्याबद्दल हवेली क्रमांक ४ चे सहदुय्यम निबंधक रवींद्र बी. तारू यांना गुरुवारी तडकाफडकी निलंबित करण्यात आले.
अंबादास दानवे यांनी जमीन घोटाळा प्रकरणावरून पार्थ पवार आणि अजित पवार यांच्यावर पुन्हा एकदा टीका केली आहे. “कोरेगाव पार्क प्रकरणात गुन्हा दाखल झाला पण यामध्ये पार्थ पवार आणि त्यांच्या कंपनीचे नाव वगळण्यात आले आहे. सरकारचे जादूचे प्रयोग सुरू झाले आहेत. ते ही प्रकरण उघडकीस आल्याच्या अवघ्या २४ तासात, पण असं चालणार नाही. मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाची चौकशी करावी,” असे दानवे यांनी म्हटले आहे.
या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशी समितीमध्ये सरकारने निवृत्त न्यायमूर्तींचा समावेश करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. सध्या या प्रकरणाची चौकशी करणारे अधिकारी निश्चितच स्वच्छ प्रतिमेचे आहेत, पण प्रकरणामध्ये गुंतलेली नावे पाहता निवृत्त न्यायमूर्ती असणे आवश्यक आहे, असे दानवे यांनी म्हटले आहे.


