पुणे : प्रतिनिधी
पुण्यातील कोरेगाव पार्कमधील तब्बल 40 एकर मोलाच्या जमिनीचा व्यवहार आता राज्याच्या राजकारणात नवा वाद निर्माण करत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्या ‘अमेडिया एंटरप्रायझेस एलएलपी’ या कंपनीने ही जमीन सुमारे 1,800 कोटी रुपयांच्या बाजारभावाऐवजी केवळ 300 कोटी रुपयांत विकत घेतल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या व्यवहारासाठी केवळ 500 रुपयांची स्टॅम्प ड्युटी भरल्याचेही समोर आले आहे.
या प्रकरणात गंभीर अनियमितता झाल्याचे लक्षात आल्यानंतर राज्य सरकारने तत्काळ कारवाई करत पुण्याचे तहसीलदार सूर्यकांत येवले आणि दुय्यम निबंधक रवींद्र तारु यांना निलंबित केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः या कारवाईचे आदेश दिले असून, चौकशीसाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांची विशेष समिती नियुक्त करण्यात आली आहे.
या प्रकरणात आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांनी थेट मागणी केली आहे की, या जमीन व्यवहाराची चौकशी पूर्ण होईपर्यंत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा. खडसे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, “हा व्यवहार बेकायदेशीर आणि संशयास्पद आहे. ही जमीन महारवतनाची असून, अशा जमिनीच्या खरेदीसाठी महसूल आयुक्तांची परवानगी आवश्यक असते, मात्र ती घेतलेली नाही. त्यामुळे हा व्यवहार तात्काळ रद्द करावा.”
खडसे यांनी पुढे म्हटले की, संबंधित कंपनीचे भागभांडवल फक्त एक लाख रुपये असून एवढ्या मोठ्या व्यवहारासाठी पैसा कुठून आला, याची चौकशी व्हावी. “कागदपत्रांमध्ये बनावट माहिती दिल्याचे दिसते. त्यामुळे जबाबदार अधिकाऱ्यांवर आणि संबंधित व्यक्तींवर फौजदारी कारवाई करावी,” अशी मागणीही त्यांनी केली.


