पुणे : वृत्तसंस्था
राज्यात स्थानिक निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. त्यामुळे सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली असून आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे मतदार याद्यांमधील घोळ आणि दुबार मतदान यावर थेट आणि प्ररखड मत व्यक्त करताना सत्याचा मोर्चात दिसले. मुंबईत आयोजित केलेल्या या मोर्चात महाविकास आघाडीतील महत्वाचे नेतेही सहभागी झाले होते.
उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या भाषणांनी या प्रश्नावर बोट ठेवून राज्य निवडणूक आयोगाला खडेबोल सुनावले. या प्रश्नावर राज ठाकरे सातत्याने आपले मत मांडताना दिसत आहेत. मुंबईत ठाकरे बंधू एकत्रित उतरणार असल्याचे जवळपास निश्चित झाले असल्याचे संकेत दोघांनीही दिलेले आहेत. केवळ अधिकृत घोषणाच होणे बाकी आहे.
मनसेसाठी राज्यातील राजकीय चित्र परिपूर्ण नाही. राज ठाकरे आणि मनसेतील काही महत्वाचे नेते पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठका घेत असून, आगामी नगरपरिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीला कशा पद्धतीने सामोरे जायचे यासाठी उभारी देण्याचे काम करत आहेत.
पुण्यात मनसेसाठी पोषक वातावरण नसल्याचे सध्या तरी दिसत आहे. पुण्यात मनसेचा एकमेव माजी नगरसेवक आहे. नगरपरिषदा पंचायत समिती यांच्या निवडणुकानंतर राज्यात जिल्हा परिषद पंचायत समिती आणि त्यानंतर महापालिका निवडणुका होणार असल्याचे निश्चित आहे. याच पार्श्वभूमीवर राज ठाकरे पुणे दौऱ्यावर आले आहेत. त्यांनी पुणे दौऱ्यात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक घेतली.
या बैठकीत ते पदाधिकाऱ्यांवर चांगलेच संतापल्याची माहिती आहे. बैठकीत त्यांनी नाराजी देखील व्यक्त केली आहे. “काम करा नाहीतर पद सोडा,” अशा कठोर शब्दांत राज यांनी पदाधिकाऱ्यांना सुनावलं आहे. ज्यांनी आतापर्यंत काहीच काम केले नाही, त्यांना त्यांनी “इतक्या दिवसात काय काम केलं? असा थेट सवालही त्यांनी केला आहे.
केवळ पद भूषवून चालणार नाही, तर पक्षासाठी सक्रिय काम करणे आवश्यक आहे, असे राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांनी सांगितले. काम केले नाही तर कारवाई करणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.


