मुंबई : प्रतिनिधी
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. पार्थ पवार यांच्या मालकीच्या Amadea Holdings LLP या कंपनीने पुण्यातील कोरेगाव पार्क परिसरात अंदाजे १,८०४ कोटींच्या बाजारभावाची ४० एकर जमीन फक्त ३०० कोटींना विकत घेतल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. या व्यवहारावरून ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी प्रश्न उपस्थित केल्यानंतर आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
दमानिया यांनी एका ट्वीटद्वारे मुख्यमंत्र्यांना प्रश्नांची सरबत्ती केली आहे. “पार्थ अजित पवार हे डायरेक्टर असलेल्या Amadea Holdings LLP ने महार वतनाची जमीन विकत घेतली आणि दोन दिवसांतच स्टँप ड्यूटी माफ करण्याचे आदेश आले! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता आपल्या ‘लाडक्या’ उपमुख्यमंत्र्यांवर कारवाई करतील का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
तसेच, त्यांनी कायद्याचा दाखला देत म्हटले की, Bombay Inferior Village Watans Abolition Act, 1958 नुसार महार वतनाची जमीन सरकारच्या परवानगीशिवाय विकता येत नाही, त्यामुळे हा व्यवहार बेकायदेशीर (illegal transfer) असल्याचे त्यांनी नमूद केले. “महसूल मंत्री ही जमीन जप्त करण्याचे आदेश कधी देणार?” असा सवालही दमानियांनी केला.
दमानिया पुढे म्हणाल्या, “हा व्यवहार १० कोटींपेक्षा जास्त रकमेचा आहे, त्यामुळे EOW आणि ED ने चौकशी करावी. फक्त १ लाख रुपयांच्या Paid-Up Capital असलेल्या कंपनीकडे ३०० कोटी रुपये कुठून आले? हे जर पार्थ पवारांनी दिले असतील तर तो Office of Profit ठरतो आणि अजित पवारांना राजीनामा द्यावाच लागेल.”
तसेच, “शेतकऱ्यांना फुकटखाऊ म्हणणारे अजित पवार आता स्वतःच्या मुलाच्या १८०४ कोटींच्या डीलवर १२६ कोटींची स्टँप ड्यूटी माफी घेणार का? ही माफी फुकट नव्हती का?” असा तिखट सवाल अंजली दमानिया यांनी उपस्थित केला आहे.


