जळगाव : प्रतिनिधी
शहरातील तीन नामांकित ज्वेलर्सच्या दुकानांतून एका महिलेने हातचलाखीने तब्बल ४ लाख ७० हजार रुपये किमतीच्या सोन्याच्या अंगठ्या लंपास केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी शनिपेठ पोलिस ठाण्यात अज्ञात महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, तपासात हीच महिला तीन वेगवेगळ्या चोरीच्या घटनांमध्ये सामील असल्याचे समोर आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आर. सी. बाफना ज्वेलर्स (सुभाष चौक) येथील व्यवस्थापक गणेश राजाराम काळे (रा. अयोध्या नगर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, ४ नोव्हेंबर रोजी अंगठ्यांच्या ट्रेमध्ये २२ कॅरेट सोन्याच्या अंगठीच्या जागी नकली अंगठी आढळली. सीसीटीव्ही तपासात २७ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी ५ वाजता हिरव्या रंगाचा पंजाबी ड्रेस घातलेली महिला दुकानात आल्याचे दिसून आले. अंगठ्या पाहण्याच्या बहाण्याने त्या महिलेनं १ लाख ८५ हजार रुपये किमतीच्या दोन अंगठ्या बोटात घालून, त्यांच्या जागी नकली अंगठ्या ठेवल्या.
दरम्यान, तक्रार देण्यासाठी पोलिस ठाण्यात गेलेले गणेश काळे यांना भंगाळे गोल्ड ज्वेलर्सचे व्यवस्थापक संतोष चव्हाण भेटले. त्यांच्या दुकानातही २७ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी ५:३० वाजता याच वर्णनाच्या महिलेने १ लाख ४५ हजार रुपये किमतीची सोन्याची अंगठी हातचलाखीने चोरली होती. अशा प्रकारे अर्ध्या तासाच्या अंतरात या महिलेने दोन्ही दुकानांतून तीन अंगठ्या (३२ ग्रॅम वजनाच्या) लंपास केल्या असून, किंमत सुमारे ३ लाख ३० हजार रुपये इतकी आहे.
याशिवाय, जिल्हापेठ पोलिस ठाण्यात दाखल तक्रारीनुसार, २७ ऑक्टोबर रोजीच संध्याकाळी ६ ते ७ दरम्यान पु. ना. गाडगीळ अँड सन्स ज्वेलर्स येथूनही याच वर्णनाच्या महिलेने १ लाख ४० हजार रुपये किमतीची १० ग्रॅमची अंगठी चोरल्याचे उघड झाले आहे.
अशा प्रकारे एका दिवशी शहरातील तिन्ही प्रतिष्ठित ज्वेलर्सच्या दुकानांत नकली अंगठ्या ठेवून सोन्याच्या अंगठ्या लांबविण्याची ही साखळी चोरी समोर आली असून, पोलिसांनी अज्ञात महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.


