सातारा : वृत्तसंस्था
राज्यातील फलटण येथील मृत महिला डॉक्टरच्या कुटुंबीयांनी मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे पाटील यांची अंतरवाली सराटी येथे जाऊन भेट घेतली असल्याची माहिती समोर आली आहे. फलटणच्या उपजिल्हा रुग्णालयात डॉ.संपदा मुंडे काम करत होत्या, परंतु वरिष्ठांच्या दबावामुळे त्यांनी आत्महत्या केली. या घटनेने महाराष्ट्रात एकच संतापाची लाट उसळली असून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर टीकेची झोड उठवली आहे. अशातच संपदा मुंडे यांच्या कुटुंबीयांनी जरांगे पाटलांची भेट घेतली आहे.
शनिवारी मनोज जरांगे हे स्वतः मुंडे कुटुंबीयांच्या भेटीला वडवणी तालुक्यातील कवडगाव येथे गेले होते. यावेळी बोलताना ते म्हणाले होते की संपदाताईला न्याय मिळण्यासाठी मी पाठपुरावा करणार आहे. मुंडे कुटुंबीयांनी चार मागण्या केल्या, त्यातील एक मार्गी लावली, इतर तीन मागण्या आपण मार्गी लावू, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले होते. तसेच या विषयावर मी अजित पवार यांच्याशी देखील चर्चा करणार असल्याची माहिती मनोज जरांगे पाटील यांनी दिली.
मृत डॉ. संपदा मुंडे या मूळच्या बीड जिल्ह्यातल्या होत्या. नोकरीसाठी त्या सातारा जिल्ह्यातील फलटणच्या उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत होत्या. त्यांच्या आत्महत्येमुळे पोलिस अधीक्षक तसेच रुग्णालयातील काही वरिष्ठांची चौकशी सुरू आहे. परंतु, अद्यापही मुंडे यांना न्याय मिळत नसल्याने विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.


