मुंबई : वृत्तसंस्था
राज्यात नुकतेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्या असून आता राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थान ‘मातोश्री’बाहेर लावण्यात आलेल्या वादग्रस्त पोस्टरमुळे शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. उत्तर भारतीय सेनेच्या वतीने “उत्तर भारतीय बटोगे तो पिटोगे” असा थेट धमकीवजा इशारा या बॅनरमधून देण्यात आला आहे. या बॅनरमुळे नव्या वादाला तोंड फुटणार असल्याचे बोलले जात आहे.
राज्य निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची मंगळवारी घोषणा केली. राज्यातील 246 नगर परिषदा आणि 42 नगर पंचायतींच्या निवडणुका डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला होणार आहेत. या सर्व निवडणुका एकाच टप्प्यामध्ये होणार आहेत. येत्या 2 डिसेंबरला यासाठी मतदान आणि दुसऱ्याच दिवशी म्हणजे 3 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. यामुळे सध्या राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. त्यातच आता मुंबईत उत्तर भारतीय सेना या संघटनेने लावलेल्या अत्यंत वादग्रस्त बॅनरमुळे पुन्हा एकदा ढवळून निघाले आहे.
मुंबईतील शिवसेना भवन, शिवाजी पार्क, आणि मातोश्री यांसारख्या शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या प्रमुख क्षेत्रांमध्ये हे बॅनर लावण्यात आले आहे. या बॅनरवर उत्तर भारतीयांना ‘सावधान’ असा मोठा इशारा देण्यात आला आहे. त्यासोबतच “उत्तर भारतीय बटोगे तो पिटोगे” असा थेट धमकीवजा मजकूर पाहायला मिळत आहे. तसेच, “महाराष्ट्र से बिहार तक, राजस्थान से यूपी तक” असाही यात उल्लेख करण्यात आला आहे. या बॅनरच्या खाली ‘उत्तर भारतीय सेना’ असे लिहिले असून, संघटनेचे अध्यक्ष सुनील शुक्ला यांचा फोटोही छापण्यात आला आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घोषित झाल्यामुळे सध्या पक्षांमध्ये मतदारांवर पकड मजबूत करण्याची धडपड सुरू आहे. मुंबई-ठाण्यात उत्तर भारतीय मतदारांचा प्रभाव मोठा असल्याने, हे पोस्टर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आले आहे, हे विशेष लक्षवेधी ठरत आहे. पोस्टरमागचा उद्देश उत्तर भारतीय मतदारांना एकत्र ठेवण्याचा असल्याचे बोलले जात आहे. राज्यात विशेषतः मुंबई-ठाण्यात उत्तर भारतीय मतदारांची संख्या लक्षणीय असल्याने, निवडणुकीच्या काळात या घोषणांना विशेष महत्त्व प्राप्त होते. पण त्यातील भाषा आणि मजकूर पाहता शहरात तणाव निर्माण होण्याची शक्यता वाढली आहे.
‘उत्तर भारतीय सेना’चे अध्यक्ष सुनील शुक्ला गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्रातील उत्तर भारतीय समाजाच्या हक्कांसाठी आक्रमक भूमिका घेत आहेत. विशेषतः मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वक्तव्यांवर त्यांनी सातत्याने आक्षेप घेतले असून, काही प्रकरणांमध्ये न्यायालयातही दाद मागितली आहे. मात्र, आता मातोश्रीसमोरच वादग्रस्त बॅनर लागल्याने कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या वादग्रस्त पोस्टरमुळे मुंबई पोलिसांपुढे मोठे आव्हान उभे राहिले आहे. शहरात आधीच निवडणुकीचे तापलेलं वातावरण असताना, प्रादेशिक भावना भडकवणाऱ्या अशा पोस्टरवर कोणती कारवाई केली जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


