एरंडोल : प्रतिनिधी
तालुक्यातील खेडी कढोली गावात मंगळवारी झालेल्या गोळीबाराच्या घटनेतील जखमी सोनू सुभाष बडगुजर याच्या प्रकृतीत सुधारणा झाली आहे. त्याच्यावर जळगाव येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असून, शस्त्रक्रियेद्वारे छातीत अडकलेली गोळी काढण्यात आली आहे. तर या प्रकरणी जितू ईश्वर कोळी (वय २२) याच्याविरुद्ध एरंडोल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी सायंकाळी जिल्हा परिषद शाळेच्या संरक्षण भिंतीलगत असलेल्या टपऱ्यांच्या मागे काही युवक हुल्लडबाजी करीत होते. त्याच वेळी जितूकडून अचानक गोळी सुटली आणि थेट सोनूच्या छातीत जाऊन लागली होती.गावातील मराठी शाळा परिसर हा सध्या रात्रीच्या वेळी दारू पिणाऱ्यांचा अड्डा बनला आहे. गोळीबारानंतर दोन दिवसांपासून मोबाइल फॉरेन्सिक व्हॅन गावात आणून तपासणी सुरू असून, घटनेच्या सर्व बाजूंनी चौकशी केली जात आहे.
काही दिवसांपूर्वीच खेडी खुर्द येथे दुर्गादेवी विसर्जनावेळी दोन गटांमध्ये झालेल्या हाणामारीत शस्त्रांचा सर्रास वापर झाला होता. त्या घटनेत काही युवक गंभीर जखमी झाले होते. आता पुन्हा ही गोळीबाराची घटना घडल्याने परिसरात भितीचे वातावरण आहे. पोलिसांनी रात्रीच्या वेळी गस्त वाढवण्याची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.


