मुंबई : वृत्तसंस्था
देशातील सुप्रीम कोर्टाने राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ३१ जानेवारीपूर्वी पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे गेल्या तीन महिन्यापासून निवडणूक आयोगाने अंग झटकून कामाला सुरुवात केली आहे. त्यानुसार जिल्हा परिषद, पंचायत समितीसाठी गट व गणांची रचना, आरक्षण व मतदार यादीचे काम जवळपास पूर्ण केले आहे तर नगरपालिकेची प्रभाग रचना, आरक्षण सोडत, तर अंतिम मतदार यादी 31ऑक्टोबरला जाहीर केली आहे. त्यामुळे आता येत्या आठ दिवसातच जिल्हा परिषद, पंचायत समिती व महापालिकाना मागे ठेवून पहिल्या टप्प्यात नगरपालिकांचा धुरळा उडणार आहे. त्यानुसार 7 नोव्हेंबरला मतदान केंद्राची यादी जाहीर झाल्यानंतर कोणत्याही क्षणी निवडणुकीचे धुमशान आयोगाकडून जाहीर होण्याची शक्यता आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूका गेल्या पाच वर्षांपासून रखडल्या होत्या. त्यामुळे सर्वांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. निवडणूक आयोगाच्या या पूर्वीच्या कार्यक्रमानुसार सुरुवातीला जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका नोव्हेंबर अखेरपर्यंत होणार होत्या.
मात्र, मध्येच राज्यातील आठ ते दहा जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टी झाल्याने निवडणूक कार्यक्रमात बदल करण्यात आला असल्याचे समजते. अद्याप राज्यातील काही जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळालेली नाही. हे मदत देण्याचे काम नोव्हेंबर महिनाभर चालणार आहे. त्यामुळे या ठिकाणच्या जिल्हाधिकारी यांच्याकडे आधी जि. प. निवडणूक घ्यावी का नगरपालीका? याबाबत विचारणा करण्यात आली होती. यावर जिल्हाधिकाऱ्यांनी अतिवृष्टीग्रस्त भागात लगेच जिल्हा परिषद, पंचायत समित्यांची निवडणूक घेण्यासारखी स्थिती नाही, असे मत नोंदविले होते.
राज्यातील 172 नगरपालिका व 71 नगरपंचायतीच्या निवडणुका रखडलेल्या आहेत. त्यामुळे नगर पंचायत व नगरपालिका निवडणुकांची घोषणा राज्य निवडणूक आयोग पुढील आठवड्यात करण्याची दाट शक्यता आहे. जिल्हा परिषदांऐवजी आधी नगरपालिकांची निवडणूक होईल हे जवळपास निश्चित झाले असल्याचे सूत्रांकडून समजते.
6 किंवा 7 नोव्हेंबरला आयोग पत्रकार परिषद घेऊन नगरपालिका निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्याची शक्यता आहे. ग्रामीण महाराष्ट्रात अतिवृष्टी व पुरामुळे मोठे नुकसान झाले असून शेतकरी व सामान्य नागरिक त्यातून सावरत आहेत. त्यातच काही भागात गेल्या आठ-पंधरा दिवसांत मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे. त्यामुळे आता नगरपालिकांची निवडणूक आधी होणार आहे. नोव्हेंबरअखेर एकाच दिवशी मतदान होईल, असेही समजते. निवडणुकीची घोषणा 7 नोव्हेंबरनंतर होणार असल्याने आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे.
नगरपालिका व नगरपंचायतीसाठीची अंतिम मतदार यादी 31 ऑक्टोबरला जाहीर करण्यात आली आहे तर 7 नोव्हेंबरला मतदान केंद्राची यादी जाहीर करण्यात येणार आहे. त्यामुळे मतदान केंद्राची यादी जाहीर झाल्यानंतर कोणत्याही क्षणी निवडणुक आयोगाकडून कार्यक्रमाची घोषणा होणार आहे.
दुसरीकडे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी अंतिम मतदार यादी 27 ऑक्टोबरला जाहीर करण्यात येणार होती. मात्र, त्याला 15 दिवसाची मुदतवाढ देण्यात आली आहे. आता ही यादी 15 दिवसांची मुदतवाढ मिळाल्यामुळे, 12 नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध होईल. ही मुदतवाढ मतदार याद्या अद्ययावत करण्यासाठी आणि त्यातील दुबार नावे वगळून अचूक यादी तयार करण्यासाठी देण्यात आली आहे. त्यामुळे त्याच दिवशी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुक पुढे जाणार हे निश्चित झाले होते तर आता नगरपालिकेच्या मतदार यादीला मुदतवाढ देण्यात आली नसल्याने आता नगरपालिका निवडणुकीची घोषणा लवकरच होण्याची शक्यता आहे.


