


मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील महायुती सरकारची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेदरम्यान, अनेक फसवणुकीचे प्रकार समोर आले. यानंतर राज्य सरकारकडून योग्य ती खबरदारी घेत पडताळणी सुरू केली आहे. याचदरम्यान आता लाडकी बहीण योजनेसाठी e-KYC बंधनकारक करण्यात आली आहे. त्यानुसार आता लाडक्या बहिणींना दरवर्षी केवायसी करावी लागणार आहे.
सर्व पात्र महिलांना ई केवायसी (e-KYC) करताना काही तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत होते, मात्र आता लाडक्या बहिणींच्या ई केवायसी सर्व्हरमध्ये सुधारणा करण्यात आल्याने पुढील काही दिवसांत ई-केवायसी करण्याचे आवाहन मंत्री आदिती तटकरेंनी केलं आहे. तसेच ई-केवायसी करण्याची अंतिम तारीख देखील जाहीर करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये पारदर्शकता येण्यासाठी व लाभार्थ्यांना नियमितपणे आर्थिक लाभ मिळण्यासाठी e-KYC सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या प्रक्रियेत अधिक सुसूत्रता आणण्याबाबत आज मंत्रालयात बैठक घेतली. दिनांक 18 सप्टेंबर 2025 पासून https://ladakibahin.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर e-KYC सुविधा उपलब्ध आहे. यासाठी 2 महिन्यांचा कालावधी देण्यात आला असून आतापर्यंत बहुतांश लाडक्या बहिणींनी ही प्रक्रिया पूर्ण केली आहे. उर्वरित लाभार्थी भगिनींनीही 18 नोव्हेंबर 2025 पूर्वी e-KYC प्रक्रिया पूर्ण करावी असे मी सर्वांना आवाहन करते, असं आदिती तटकरे म्हणाल्या. म्हणजेच, 18 नोव्हेंबर 2025 ही e-KYC प्रक्रिया पूर्ण करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे या तारखेआधीच पात्र लाभार्थी महिलांनी ही प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी लागणार आहे.
ई-केवायसी प्रक्रिया कशी पूर्ण कराल?
मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेच्या e-KYC साठी https://ladakibahin.maharashtra.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.
लॉगिन केल्यावर ईकेवायसी प्रक्रिया पूर्ण करण्याविषयीचा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करावे.
या फॉर्ममध्ये लाभार्थ्याने आपला आधार क्रमांक आणि पडताळणी संकेतांक (Captcha Code) नमूद करून, आधार प्रमाणीकरणासाठी संमती देत Send OTP या बटणावर क्लिक करावे.
त्यानंतर लाभार्थ्याच्या आधार-लिंक मोबाईल क्रमांकावर OTP येईल. हा OTP टाकून Submit बटणावर क्लिक करावे.
त्यानंतर लाभार्थ्याला आपला जात प्रवर्ग निवडावा लागेल आणि खालील बाबी प्रमाणित (Declaration) कराव्या लागतील:
1. माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित/कायम कर्मचारी म्हणून शासकीय विभाग/उपक्रम/मंडळ/भारत सरकार किंवा राज्य शासनाच्या स्थानिक संस्थेत कार्यरत नाहीत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत नाहीत.
2. माझ्या कुटुंबातील केवळ १ विवाहित आणि १ अविवाहित महिला या योजनेचा लाभ घेत आहे. वरील बाबींची नोंद करून चेक बॉक्सवर क्लिक करावे व Submit बटण दाबावे.
शेवटी, Success – तुमची e-KYC पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे असा संदेश दिसेल.


