


मुंबई : वृत्तसंस्था
स्थानिक निवडणुकीची लगबग सुरु झाली असून आता राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी (दि. २८ ऑक्टोबर) रात्री ट्रायडंट हॉटेलमध्ये झालेल्या पक्ष बैठकीत पक्षाचे आमदार आणि मंत्र्यांना स्पष्ट शब्दांत तंबी दिली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी तातडीने कामाला लागण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत. उगाचच मुंबईत थांबू नका. मतदार संघात जाऊन काम करा अशी तंबीच अजित पवार यांनी आपल्या आमदारांना दिली आहे. याचबरोबर त्यांनी कोणाच्या भरवशावर राहू नका अशी सूचक सूचना देखील केली आहे.
अजित पवारांनी पक्षाच्या सर्व आमदारांसोबतच्या बैठकीत, आमदारांनी विनाकारण मुंबईत न थांबता आपापल्या मतदारसंघांत जाऊन काम करावे. निवडणुकीच्या तयारीसाठी कुणावरही (कोणाच्याही विश्वासावर) अवलंबून न राहता स्वतः काम करण्याची सूचना केली. अजित पवार यांनी, ५०% संपर्क मंत्री त्यांच्या जिल्ह्यांमध्ये फिरून पक्षाचे काम करत नाहीत. असं म्हणत नाराजी देखील व्यक्त केली. त्यांनी संपर्क मंत्र्यांनी त्यांच्या जिल्ह्यात फिरून पक्षाचं काम करावे, असे स्पष्ट आदेश दिले आहेत.
सध्या सर्वच राजकीय पक्ष आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या कामाला लागले आहेत. अनेक मंत्री आणि आमदार मुंबईत ठाण मांडून असल्यामुळे ते मतदारसंघाकडे दुर्लक्ष करत असल्याची कार्यकर्त्यांची तक्रार आहे. यामुळे कार्यकर्त्यांपर्यंत कोणी पोहोचत नाही आणि त्याचा परिणाम निवडणुकीच्या तयारीवर होऊ शकतो. या पार्श्वभूमीवर, अजित पवारांनी आमदारांना आणि मंत्र्यांना ही सूचना वजा तंबी दिली आहे. त्यांना आता मिळालेल्या सूचनांचे पालन करून मतदारसंघांत सक्रिय व्हावे लागणार आहे.


